मुन्ना यादवच्या मुलाकडून खासदार क्रीडा महोत्सवात राडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2023 10:01 PM2023-01-20T22:01:02+5:302023-01-20T22:02:50+5:30
Nagpur News भाजप नेते मुन्ना यादव यांचा मुलगा करण यादव याने खासदार क्रीडा महोत्सवातील क्रिकेट सामन्यादरम्यान राडा केला. किरकोळ कारणावरून त्याने सामन्याच्या स्कोअररला मारहाण केली. ही घटना गुरुवारी दुपारी छत्रपतीनगर येथील क्रिकेट मैदानावर घडली.
नागपूर : भाजप नेते मुन्ना यादव यांचा मुलगा करण यादव याने खासदार क्रीडा महोत्सवातील क्रिकेट सामन्यादरम्यान राडा केला. किरकोळ कारणावरून त्याने सामन्याच्या स्कोअररला मारहाण केली. ही घटना गुरुवारी दुपारी छत्रपतीनगर येथील क्रिकेट मैदानावर घडली. नेत्याच्या मुलाने केलेल्या मारहाणीमुळे खासदार क्रीडा महोत्सवाशी संबंधित भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी आहे. घटनेच्या २४ तासांनंतर पोलिस ठाण्यात पोहोचल्यानंतर मेडिकलला रवाना झालेला जखमी स्कोअरर अचानक बेपत्ता झाल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे.
खासदार क्रीडा महोत्सवांतर्गत विविध ठिकाणी स्पर्धा घेण्यात येत आहेत. छत्रपती नगर क्रिकेट मैदानावर क्रिकेटचे सामने सुरू आहेत. गुरुवारी दुपारी १ वाजता एलेव्हन स्टार आणि खामला स्टार यांच्यात सामना सुरू होता. मुन्ना यादवचा मुलगा करण आणि त्याच्या साथीदारांनी थ्रो बॉलबाबत अम्पायरच्या निर्णयावर वाद घालण्यास सुरुवात केली. हे पाहून सामन्याचा स्कोअरर अमित होशिंगने करणला सामन्याच्या नियमांचा हवाला दिला. हे पाहून करणने अमितला शिवीगाळ करत त्याच्यावर बॅटने हल्ला केला. अमित घाबरून पळू लागला तेव्हा करणने धावत जाऊन त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. हे पाहून खेळाडू आणि भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाली. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी कसे तरी करणला शांत केले आणि त्याला पाठवले. गुरुवारी रात्री ८ वाजता करण पुन्हा तेथे पोहोचला आणि गोंधळ घालत तेथील लोकांना बघून घेण्याची धमकी देऊ लागला. कार्यक्रमाच्या आयोजनाची जबाबदारी असलेल्या भाजपच्या अधिकाऱ्यांनाही त्याच्या नातेवाइकांनी फोन करून धमकावले. या घटनेने घाबरलेल्या अमित होशिंगने शुक्रवारी दुपारी हिंमत एकवटून अमितने प्रतापनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अमितला मेडिकलसाठी पाठवून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली. पोलिस स्टेशनमधून बाहेर पडल्यानंतर अमित आश्चर्यकारकपणे गायब झाला. त्याला करणच्या सहकाऱ्यांनी तो बेपत्ता झाल्याची बातमी पसरताच हे प्रकरण चांगलेच तापले. मुन्ना यादव आणि कुटुंबीय यापूर्वीही मारहाण व दादागिरीच्या घटनांमुळे चर्चेत राहिले आहे.
खरोखर कारवाई होणार का?
शुक्रवारी दुपारी या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होताच हे प्रकरण तापले. व्हिडीओमध्ये करण यादव अमिताला मारहाण करत असून त्याचा पाठलाग करत असल्याचे त्यात दिसून आले. यानंतर करणच्या साथीदारांनी प्रकरण शांत करण्यासाठी हातपाय मारण्यास सुरुवात केली. यादवची बड्या नेत्यांशी ‘थेट’ ओळख असल्याने यात कारवाई होणार का असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.