मस्तीखोरांचा उपद्रवी वाढदिवस, तोंडाला केक लावाला म्हणू बर्थ डे बॉयने मित्राला बदडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2021 11:38 AM2021-09-28T11:38:33+5:302021-09-28T12:00:49+5:30
बर्थ डे पार्टीत केक तोंडाला का लावला म्हणून एका बर्थ डे बॉयने स्वत:च्या मित्राला बेदम मारहाण केली. तसेच, रागाच्या भरात दारूची बाटलीही डोक्यावर फोडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वाढदिवस सेलिब्रेशनची क्रेज आपल्याकडे आता काही नवीन नाही. मज्जा-मस्ती , गोंधळ-पार्टी अशी काहीशी वाढदिवसाची गमंत असते. वाढदिवस येतो-न-येतो मित्र पार्टी मागणं सुरू करतात. मात्र, कधी-कधी ही मज्जा-मस्ती वादाचं कारणही ठरू शकते, नागपुरातही एका बर्थडे बॅशमध्ये झालेला राडा सध्या चर्चेत आहे.
आधी बर्थ डे पार्टीत बोलावून मग केक तोंडाला लावला म्हणून एका बर्थ डे बॉयने स्वत:च्या मित्राला धू-धू धूतले. रविवारी रात्री ९ च्या सुमारास कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत भारतीय विद्यार्थी सेनेच्या कार्यालयाजवळ ही घटना घडली. यामुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे. रितेश मोतीलाल हिरवानी (२६, रा. डिप्टी सिग्नल) असे या हाणामारीत जखमी झालेल्याचे नाव असून राहुल महामल्ला (१८), संदीप राजेश महामल्ला आणि नरेश महामल्ला अशी आरोपींची नावे आहेत.
राहुलने आपल्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी मित्रांना आमंत्रित केले. तेथे संदीप राजेश महामल्ला आणि नरेश महामल्ला हे देखील होते. ते सर्व रितेशचे मित्रच आहेत. पार्टीत खाणं-पिणं अगदी जोरात सुरू होतं, त्यात केटकटींगही जोरात झाले. त्यानंतर केक एकमेकांच्या तोंडाला फासणं सुरू झालं. यावेळी रितेशने राहुलच्या तोंडाला केक लावण्याचा प्रयत्न केला मात्र, राहुलने त्याला अडवले. पण मज्जामस्ती म्हणून रितेशने राहुलच्या तोंडाला केक फासलाच! त्यामुळे राहुल चिडला आणि तु केक लावलाच कशाला म्हणत त्याने रितेशला राहुलने रितेशला थापड मारली.
त्यांच्यात वाद सुरू झाला आणि प्रकरण हातापायीवर गेले, दरम्यान आरोपी संदीप आणि नरेश महामल्लानेही राहुलचा साथ देत दारूची बाटली रितेशच्या डोक्यावर फोडली. नंतर त्याला दांडक्याने बेदम मारहाण केली. यामुळे रितेश गंभीर जखमी झाला. या हाणामारीमुळे परिसरात तणाव निर्माण झाला. माहिती कळताच कळमना पोलीस पोहोचले. त्यांनी रितेशच्या तक्रारीवरून आरोपी राहुल, संदीप आणि नरेश या तिघांवर विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला.