नागपूर मनपा स्थायी समिती अध्यक्षपदासाठी होले-कुकरेजा यांच्यात रस्सीखेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 10:59 PM2018-02-19T22:59:23+5:302018-02-19T23:00:40+5:30
शहरातील विकास कामांना गती मिळावी. सोबतच जातीय समीकरणाचा विचार करून महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षांची निवड केली जाणार आहे. अध्यक्षपदासाठी नगरसेवक सतीश होले, वीरेंद्र कुकरेजा, राजेश घोडपागे, प्रदीप पोहाणे व संजय बंगाले आदींच्या नावांवर भाजपाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लोकसभा व विधानसभेच्या पुढील वर्षात निवडणुका होत आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील विकास कामांना गती मिळावी. सोबतच जातीय समीकरणाचा विचार करून महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षांची निवड केली जाणार आहे. अध्यक्षपदासाठी नगरसेवक सतीश होले, वीरेंद्र कुकरेजा, राजेश घोडपागे, प्रदीप पोहाणे व संजय बंगाले आदींच्या नावांवर भाजपाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. पाच जणांची नावे चर्चेत असली तरी अध्यक्षपदासाठी होले व कुकरेजा यांच्यातच खरी रस्सीखेच सुरू आहे. अध्यक्षांच्या नावावर मंगळवारी सकाळी भाजपाच्या पार्लमेन्ट्री बोर्डाच्या बैठकीत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून शिक्कामोर्तब केले जाणार आहे.
सर्व विधानसभा क्षेत्रांतील नगरसेवकांना स्थायी समिती व विशेष समित्यांवर प्रतिनिधित्व दिले जाणार आहे. यात जुन्यासोबतच नवीन चेहºयांना संधी दिली जाणार आहे. स्थायी अध्यक्षपदासाठी अनेक इच्छुक असले तरी वीरेंद्र कुकरेजा व सतीश होले यांच्या पैकी एकाच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. राजेश घोडपागे, प्रदीप पोहाणे व संजय बंगाले यांची नावे चर्चेत असली तरी बंगाले यांना स्थापत्य व प्रकल्प विशेष समितीच्या सभापतिपदी कायम ठेवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राजेश घोडपागे यांचे नाव चर्चेत असले तरी त्यांच्याकडे जलप्रदाय समितीची जबाबदारी होती. यामुळे त्यांची नावे मागे पडण्याची शक्यता आहे.
तीन सभापतींना पुन्हा संधी
स्थापत्य व विद्युत समितीचे सभापती संजय बंगाले, शिक्षण विशेष समितीचे सभापती दिलीप दिवे व क्रीडा समितीचे नागेश सहारे यांना सभापतिपदावर पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे. आरोग्य सभापती मनोज चाफले, अग्निशमन समितीचे सभापती अॅड. संजय बालपांडे, महिला व बालकल्यास सभापती वर्षा ठाकरे, गलिच्छ वस्ती निर्मूलन सभापती चेतना टांक, जलप्रदाय समितीचे राजेश घोडपागे, विधी सभापती अॅड. मिनाक्षी तेलगोटे तसेच कर आकारणी व कर संकलन समितीचे सभापती अविनाश ठाकरे आदींना निरोप दिला जाणार आहे.
धुरडे यांची वर्णी?
महापालिकेतील भाजपाच्या प्रतोद दिव्या धुरडे यांची महिला व बालकल्याण समितीच्या सभापदीपदी निवड होण्याची शक्यता आहे. तसेच अभय गोटेकर यांनाही सभापतिपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सभापतींची निवड करताना प्रामुख्याने नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.