श्वानावरून पेटला वाद; दोन भाडेकरूंमध्ये जोरदार राडा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2023 02:18 PM2023-02-07T14:18:04+5:302023-02-07T14:20:47+5:30
गुन्हा दाखल
नागपूर : पाळीव श्वानावरून झालेल्या वादात दोन किरायेदार कुटुंब एकमेकांशी भिडले. आश्चर्याची बाब म्हणजे शिकलेले असूनदेखील दोन्ही कुटुंबीयांमध्ये हाणामारी झाली. हा वाद अखेर पोलिस ठाण्यात गेला व दोन्ही कुटुंबीयांनी एकमेकांविरोधात तक्रारी केल्या. दोन्ही कुटुंबीयांविरोधात गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. श्वान चावलादेखील नसताना अशाप्रकारे झालेल्या वादामुळे परिसरात विविध चर्चांना उधाण आले होते.
हनुमाननगरात प्लॉट क्रमांक ४५२ येथे गायगवळी व मेश्राम कुटुंब भाड्याने राहतात. मेश्राम कुटुंबात पांडुरंग, शांता व त्यांची सहायक प्राध्यापक असलेली मुलगी मनीषा हे आहेत, तर दुसरीकडे गायगवळी कुटुंबात वर्षा व गौरव हे दाम्पत्य राहतात. मेश्राम यांच्याकडे पाळीव श्वान आहे. रविवारी सात वाजताच्या सुमारास तो श्वान वर्षा गायगवळीजवळ गेला व अंगावर जायला लागला. तो श्वान चावण्यासाठीच हल्ला करत आहे असे वाटले व वर्षाने गौरवला बोलविले.
दाम्पत्याने मेश्राम कुटुंबीयास श्वानाला सांभाळून ठेवा, असे म्हटले. यावरून वाद झाला व मनीषा मेश्रामने मारहाण केल्याची तक्रार वर्षा गायगवळीने केली. यावरून पोलिसांनी मनीषा मेश्राम व आई-वडिलांविरोधात गुन्हा दाखल केला, तर दुसरीकडे मनीषा मेश्रामने गायगवळी दाम्पत्याने शिवीगाळ करत मारहाण केल्याची तक्रार केली. गौरव गायगवळीने जिवे मारण्याची धमकी दिल्याचादेखील आरोप केला. मनीषा मेश्रामच्या तक्रारीवरून गायगवळी दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.