धाडसाचं 'क्षितिज'... शत्रूंशी थेट भिडण्यासाठीच नागपूरचा तरुण झाला लेफ्टनंट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 10:02 AM2018-06-16T10:02:15+5:302018-06-16T12:47:16+5:30

मायभूमीच्या प्रेमासाठी आसुसलेला हा तरुण लहानपणीचे स्वप्न पूर्ण करीत अखेर लेफ्टनंट झाला. रोमांचित करणारी ही यशोगाथा आहे क्षितिज लिमसे या नागपूरकर तरुणाची.

To fight with the enemy he became Lieutenant | धाडसाचं 'क्षितिज'... शत्रूंशी थेट भिडण्यासाठीच नागपूरचा तरुण झाला लेफ्टनंट

धाडसाचं 'क्षितिज'... शत्रूंशी थेट भिडण्यासाठीच नागपूरचा तरुण झाला लेफ्टनंट

ठळक मुद्देक्षितिजने पूर्ण केले स्वप्नरँक मिळविणारा विदर्भातील एकमेव तरुण

निशांत वानखेडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सैन्यात जाण्याबाबत तरुण उदासीन असतात. त्याने मात्र आठवीपासूनच सैन्यात जाण्याचे स्वप्न बाळगले होते. वडिलांप्रमाणे आपणही सैनिकाची वर्दी घालावी, हे त्याचे ध्येय मोठे होतांना अधिकच दृढ होत गेले. त्यासाठी प्रयत्नांची शर्थ लढविली. शत्रूशी थेट भिडायचे या एकच ध्येयाने तो झपाटला होता. मायभूमीच्या प्रेमासाठी आसुसलेला हा तरुण लहानपणीचे स्वप्न पूर्ण करीत अखेर लेफ्टनंट झाला. रोमांचित करणारी ही यशोगाथा आहे क्षितिज लिमसे या नागपूरकर तरुणाची.
नागपूरच्या क्षितिज दीपक लिमसे या तरुणाने लेफ्टनंट होण्याचा मान मिळविला आहे. भारतीय सैन्यदलाच्या १४२ व्या बॅचमधून लेफ्टनंट पद प्राप्त करणारा तो विदर्भातील एकमेव तरुण असल्याने नागपूरकरांना अभिमान बाळगण्याची संधी त्याने दिली आहे. ९ जूनला ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर लेफ्टनंटची रॅँक मिळविल्यानंतर तो नागपूरला परतला तेव्हा कुटुंबीयांनी एखाद्या यौद्ध्याप्रमाणेच त्याचे स्वागत केले. लोकमतने त्याच्याशी संवाद साधला. वडील दीपक लिमसे हे सैन्यात कॅप्टन पदावर सेवा देत होते. त्यांना पाहूनच सैन्याच्या युनिफॉर्मचे आकर्षण निर्माण झाले. आपणही सैन्यातच जाणार हा निर्धार केला. त्यानुसार दहावीनंतर सैनिकी प्रशिक्षण देणाऱ्या औरंगाबादच्या सर्व्हिसेस प्रीपरेटरी इन्स्टिट्यूट (एसपीआय) मध्ये प्रवेश घेतला. त्यानंतर एनडीएची परीक्षा उत्तीर्ण करून २०१४ ते २०१७ मध्ये पुण्यात नॅशनल डिफेन्स अकादमीमध्ये प्रशिक्षण पूर्ण केले. पुढे २०१७ पासून जून २०१८ पर्यंत इंडियन मिल्ट्री अकादमी, डेहरादून येथे वर्षभराचे ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर लेफ्टनंट ही रॅँक बहाल करण्यात आली. सध्या पंजाबच्या कपूरथला भागात त्याचे पोस्टिंग झाले आहे. तेथे पीस स्टेशनवर पोस्टिंग असून येथे दोन वर्ष सेवा दिल्यानंतर आॅपरेशनल स्टेशनवर पोस्टिंग होईल आणि यासाठी मी आतुरतेने वाट पाहत असल्याचे त्याने सांगितले.
लहानपणापासून जे स्वप्न पाहिले ते प्राप्त करण्याचा आनंद काही वेगळाच आहे आणि तो मी अनुभवतो आहे. ७ जुलैला युनिटला रुजू होणार आहे. वर्दीचा आदर ती परिधान केल्यानंतर अधिक समजून येतो. या मातृभूमीने आपल्याला वाढविले आणि घडविले आहे. ते ऋण फेडण्याची संधी मला गमवायची नाही, अशी भावना त्याने व्यक्त केली.

कुटुंबीयांनी केले भरभरून स्वागत
जूनला ट्रेनिंग पूर्ण करून रॅँक मिळाल्यानंतर क्षितिजच्या कुटुंबीयांचा आनंद द्विगुणित झाला होता. गुरुवारी तो नागपूरला आला तेव्हा महाल येथील निवासस्थानी त्याचे भरभरून स्वागत करण्यात आले. आई सुवर्णा आणि बीडीएस करणारी बहीण सायली यांनी त्याच्या लहानपणीच्या आठवणी सांगणाऱ्या फोटोंनी घर सजविले होते. वडील दीपक लिमसे हे सैन्यातून कॅप्टन पदावरून निवृत्त झाले व आता सैनिक कल्याण अधिकारी म्हणून सेवारत आहेत. एकुलता एक मुलगा सैन्यात लेफ्टनंट होण्याचा अभिमान त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होता. मुलाचे लहानपणापासूनचे स्वप्न पूर्ण झाले याचे समाधान असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.


विदर्भातील तरुण या क्षेत्राकडे गंभीरतेने पाहत नाही, याची खंत वाटते. वास्तविक देशसेवेसाठी सैन्य क्षेत्रासारखे नोबल प्रोफेशन दुसरे नाही. युद्ध क्षेत्रातच पोस्टींग मिळेल, असे नाही. यात शिस्त आहे आणि व्यक्तिमत्त्वाचा आॅलराऊंड विकास करण्याची संधी आहे. तो अभिमान शब्दात व्यक्त करता येत नाही. त्यामुळे विदर्भातील तरुणांनी या क्षेत्राकडे यावे.
- क्षितिज लिमसे

Web Title: To fight with the enemy he became Lieutenant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.