धरमपेठेतील पबमध्ये राडा, डोक्यावर बिअरची बॉटल फोडत दोन मित्रांना मारहाण
By योगेश पांडे | Published: April 23, 2024 04:08 PM2024-04-23T16:08:35+5:302024-04-23T16:13:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : धरमपेठ परिसरातील पायरेट्स पबमध्ये चार तरुणांनी राडा करत पार्टी करायला आलेल्या दुसऱ्या गटातील दोन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : धरमपेठ परिसरातील पायरेट्स पबमध्ये चार तरुणांनी राडा करत पार्टी करायला आलेल्या दुसऱ्या गटातील दोन मित्रांना बेदम मारहाण केली. आरोपींनी त्यांच्या डोक्यावर बिअरची बॉटल फोडत हल्ला केला. केवळ धक्का लागला या शुल्लक कारणावरून हा राडा घडला. अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला असून परत एकदा नागपुरातील पबमध्ये गुंडागर्दी वाढत असल्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
वेस्ट हायकोर्ट रोडवर पायरेट्स पब आहे. तेथे सोमवारी मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास मिर्झा अस्लान फहीम बेग (२३, महाल) हा ओम कथले व त्याच्या दोन मित्रांसोबत पबमध्ये पार्टी करत होता. त्यांच्या शेजारी बॉबी उर्फ प्रशांत धोटे (३६, ओमनगर), पियुष उर्फ ऋषीकेश वाघमारे (२४, रेशीमबाग), रॉकी जाधव (३५) व श्रेयांश शाहू (२२, जुनी शुक्रवारी) हेदेखील पार्टी करत होते. रॉकीचा अस्लानला धक्का लागला. धक्का का मारला असे अस्लानने विचारले असता रॉकी संतापला व त्याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्याने अस्लानच्या डोक्यावर बिअरची बाटलीच मारली. यामुळे त्याच्या डोळ्याजवळ जखम झाली. ओम कथले अस्लानला वाचवायला धावला असता पियुष व श्रेयांश यांनी त्याला मारहाण केली. तर बॉबीने तेथील बसण्याची खुर्ची अस्लानच्या पाठीत मारली. रॉकीने परत बिअरची बॉटल अस्लानच्या खांद्यावर मारली. यात अस्लान गंभीर जखमी झाला. त्यानंतर चौघांनीही अस्लानला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर आरोपी फरार झाले. पबमधून कुणीतरी पोलिसांना फोन केला. पोलिसांनी घटनास्थळी येऊन अस्लानला मेयो इस्पितळात उपचारासाठी नेले. त्याच्या तक्रारीवरून अंबाझरी पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पबमधील गैरप्रकारांवर कधी नियंत्रण येणार ?
मागील काही कालावधीपासून लेटनाईट चालणाऱ्या पब्जमधील गैरप्रकारांमुळे पोलीस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या पब्जमध्ये अनेकदा राडे झाले असून ठोस कारवाई होत नसल्याने नियमांना धाब्यावर बसवले जात आहे. पबमधून बाहेर निघालेले तरुण त्यानंतर शहरातील विविध भागात तमाशे करतात. विशेषत: धरमपेठ, शिवाजीनगर, अंबाझरी, सदर, ऑरेंज स्ट्रीट या भागात पब्जबाबत नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.