मुंबई-कोंबडीवरून विधानसभेत रंगला वाद; भुजबळ आणि मनिषा चौधरी आमने-सामने
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2022 03:30 PM2022-12-21T15:30:47+5:302022-12-21T15:35:44+5:30
मुंबईला कोंबडी म्हणणं हा मुंबईकरांचा अपमान म्हणत सभागृहात गोंधळ; कामकाज तहकूब
नागपूर : मुंबई महापालिकेच्या विकासासंदर्भात बोलत असताना राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मुंबई ही सोन्याचं अंडं देणारी कोंबडी आहे, असा वाक्प्रचार केला. त्यावर दहिसरच्या आमदार मनिषा चौधरी यांनी मुंबईला कोंबडी का म्हटलं, म्हणत यावर आक्षेप घेतला. त्यावर भुजबळ यांनी ''ऐ खाली बस!'' असं तीनदा म्हटलं, असा आरोप त्यांनी केला. एक ज्येष्ठ नेते व माजी महापौर असलेल्या व्यक्तीने महिला सदस्याला असं संबोधने हे निषेधार्ह आहे. हा समस्त महिलांचा अपमान आहे अशी भावना मनिषा चौधरी यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.
दरम्यान भुजबळ यांनी हा वाक्प्रचार मराठी साहित्यात वापरला जातो, यात कुठलेही असंसदीय शब्द नाहीत. यावरून महिलांचा अपमान झाल्याचंही काही कारण नाही, असे त्यांनी सभागृहाच्या बाहेर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितले. व महिला सदस्यांचा या वक्तव्यावरून अपमान झाला असेल तर मी दिलगिरीही व्यक्त केल्याचे त्यांनी सांगितले. या संदर्भात आव्हाड म्हणाले, हा प्रकार म्हणजे अनावश्यक वाद निर्माण करून सभागृह बंद पाडण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला.
कोंबडी-मुंबई आणि गोंधळ
छगन भुजबळ यांनी मुंबईसंदर्भात बोलताना केलेल्या विधानावरून वातावरण तापले. मुंबईला कोंबडी म्हणणं हा मुंबईकरांचा अपमान आहे. ज्या शहराने तुम्हाला वेगळी ओळख मिळवून दिली त्या शहराबद्दल तुम्ही असे कसे बोलता. तसेच, हा एकट्या मनीषा चौधरी यांचा अपमान नाही, तर सर्व महिलांचा अपमान आहे. भुजबळ यांनी मुंबईबाबत वापरलेला शब्द मागे घ्यावा, अशी मागणी सत्ताधारी पक्षाने लावून धरली. त्या गोंधळात अजित पवार यांनी मुंबई ही सर्वांची आहे. मुंबईबाबत कोणीही असे वक्तव्य करू शकत नाही, असे सांगितले.