लढा पॉलिथीनमुक्त नागपूरचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 01:39 AM2017-10-04T01:39:45+5:302017-10-04T01:39:57+5:30

‘वुई डेअर ग्लोबल असोसिएशन मॅगझीन’ला सुरूवात केली तेव्हा चाळिशी पार केलेल्या गृहिणींना विरंगुळा आणि भावना मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे एवढाच विचार डोक्यात होता.

The fight is from polythene-free Nagpur | लढा पॉलिथीनमुक्त नागपूरचा

लढा पॉलिथीनमुक्त नागपूरचा

Next
ठळक मुद्दे‘स्वच्छ हिंद फौज’ सज्ज : सामाजिक उपक्रमासह रोजगाराचेही लक्ष्य

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘वुई डेअर ग्लोबल असोसिएशन मॅगझीन’ला सुरूवात केली तेव्हा चाळिशी पार केलेल्या गृहिणींना विरंगुळा आणि भावना मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे एवढाच विचार डोक्यात होता. काही वर्षे असोसिएशनची वाटचाल सुरू असताना गरीब आणि वंचित घटकातील महिला व पुरुषांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा विचार पुढे आला. मात्र एखादा व्यवसाय सुरू करण्यापेक्षा सामाजिक उपक्रमातूनच हा रोजगार कसा देता येईल हे ध्येय निश्चित केले होते. अशातच राजस्थानमध्ये स्वच्छता आणि पॉलिथीनच्या पिशव्या विरोधात राबविलेली मोहीम यशस्वी होत असल्याचे दिसले आणि आमच्या ध्येयाला एक नवी दिशा मिळाली. शहरात पॉलिथीन पिशव्या विरोधात अभियान राबवायचे आणि लोकांनी कापडी पिशव्या वापराव्यात म्हणून जनजागृती करायची असा उपक्रम निश्चित झाला. नागपुरात पायलट प्रोजेक्ट सुरू करून अख्ख्या महाराष्टÑात पॉलिथीनमुक्तीचे अभियान राबवायचे हे ध्येय प्रत्येकाला पटले. हे ध्येय प्राप्त करण्यासाठी तरुणांची शक्ती सोबत असणे आवश्यक होते. विविध महाविद्यालयातील एनएसएसचे हजारच्यावर स्वयंसेवक जुळल्याने यशस्वी सुरुवात झाली. देशाच्या स्वातंत्र्यासाठी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद फौजेची स्थापना केली. आज देशाच्या सीमेचे रक्षण करण्यासाठी आमचे सैनिक सज्ज आहेत. मात्र देशांतर्गत समस्यांविरोधात लढणारा प्रत्येक नागरिक हा सैनिकच आहे, म्हणून ‘स्वच्छ हिंद फौज’ उदयास आली. ‘वुई डेअर ते स्वच्छ हिंद फौज’ हा आतापर्यंतचा प्रवास व पुढचे मोठे ध्येय मधुबाला साबू व त्यांच्या टीमच्या सैनिकांनी लोकमत व्यासपीठावर उलगडले. या अभियानाच्या माध्यमातून कापडी पिशव्यांचा वापर ही एक फॅशन व्हावी हे ध्येय या सैनिकांनी बाळगले आहे.
स्वच्छ हिंद फौजेच्या टीमने २२ सप्टेंबर रोजी वेस्ट हायकोर्ट रोडवर मोठे व्यापारी व फुटकळ दुकानदारांना भेटून पॉलिथीनमुक्त शहरासाठी कापडाच्या पिशव्या वापरण्याचे आवाहन केले.
पॉलिथीनमुक्त नागपूरसाठी स्वच्छ हिंद फौजेचे अभियान
वूई डेअरच्या टीमने तीन महिने शाळा-महाविद्यालयात जाऊन तरुणांना यामध्ये जोडण्याचा प्रयत्न केला. एनएसएसचे डॉ. केशव वाळके यांनी एनएसएसच्या स्वयंसेवकांना या अभियानाशी जोडले. पॉलिथीन सोडण्याचे आवाहन करताना लोकांना पर्याय उपलब्ध करून देणेही गरजेचे आहे. त्यासाठी गायत्री परिवारच्या मदतीने संस्थेशी जुळलेल्या शहरातील ३०० च्यावर महिलांना रोजगार देत त्यांच्याकडून कापडी पिशव्या तयार केल्या जात आहेत. अशाप्रकारे त्या दिवशी शहरात विविध भागात १०० स्टॉल लावून २ लक्ष पिशव्या नागरिकांना व दुकानदारांना वितरित केल्या जाणार असल्याची माहिती साबू यांनी दिली. ही मोहीम का आवश्यक आहे, याचे उत्तर या प्रतिनिधींनी दिले.
असे चालेल अभियान
लोकांना नुसतेच सांगून काही होणार नाही, त्यासाठी काही कार्यक्रम देणे आवश्यक असल्याने हे अभियान राबविले जात आहे.
भविष्यात प्लास्टिकचा मोठा धोका
येत्या काळात आपण कचºयात राहतो की काय, अशी परिस्थिती निर्माण होणार आहे. यामध्ये प्लास्टिक हे अतिशय धोकादायक ठरणार असल्याने, आताच यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. आतापर्यंत प्लास्टिकचे डिस्पोज आणि पुनर्वापर करण्यावर भर दिला जात होता. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पर्यावरणात पसरल्या असल्याने त्यांच्यावर प्रक्रिया करणे अत्यंत कठीण आहे. शिवाय प्लास्टिकचा बाहेरील तापमानाशी संपर्क आल्यास त्यातील रसायने वातावरणात मिसळून कॅन्सरसाठी कारणीभूत ठरतात. त्यामुळे लोकांनी आता प्लास्टिकला नकारच देण्याची आवश्यकता आहे. बाहेरून पाणी विकत घेऊन बॉटल्स फेकण्यापेक्षा नागरिकांनी घराबाहेर पडताना स्वत:ची बॉटल घेऊन निघणे गरजेचे आहे. बाजारात जातानाही स्वत:ची कापडी बॅग घेतली पाहिजे. लोकांना कापडी बॅगची सवय व्हावी, हा आमच्या अभियानाचा उद्देश असल्याचे मधुबाला साबू यांनी सांगितले.
अधिकारच नाही, कर्तव्यही शिका
स्वच्छ हिंद फौजेच्या सक्रिय सदस्य दीपाली मानकर यांनी सांगितले, देशातील कुठल्याही समस्येसाठी सरकारला दोष देण्याची आमची सवय आहे. दिसणारा कचºयाची महापालिकेने विल्हेवाट लावावी असे मानले जाते. मात्र नागरिक म्हणून आपले कर्तव्य लक्षात घेतले पाहिजे. संविधानाने आम्हाला दिलेल्या अधिकाराची प्रत्येकाला जाणीव असते, मात्र कर्तव्याकडे दुर्लक्ष केले जाते. प्लास्टिकला दूर सारणे हे आपले कर्तव्य आहे. आपण दुसºया देशाकडे पाहतो. परदेशात गेल्यावर तेथील नियम काटेकोरपणे पाळतो. मात्र भारतात आल्यावर तेथील स्वच्छता विसरतो. प्रत्येक माणसाने पुढाकार घेतला तर बदल नक्कीच घडेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
तरुणांना सामाजिकतेची जाणीव
एनएसएसचे प्रमुख डॉ. केशव वाळके म्हणाले, तरुणांमध्ये प्रौढ नागरिकांपेक्षा सामाजिकतेची अधिक जाणीव असल्याचे दिसते. हे अभियान घेऊन शाळा महाविद्यालयात गेलो तेव्हा असंख्य तरुणांनी यामध्ये जुळण्याचा आग्रह धरला. अनेक लोक यासोबत जुळले. विशेष म्हणजे या सामाजिक उपक्रमाचा त्यांच्या शैक्षणिक गोष्टींसाठी व उद्योजक म्हणून फायदा होतो. हा तरुणांचा देश आहे व ही शक्ती विधायक कामाकडे वळली तर देश सक्षम होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Web Title: The fight is from polythene-free Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.