‘श्रीनिवास’ला उमरेड-कऱ्हांडला अभयारण्याचा ‘लळा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:09 AM2021-05-10T04:09:35+5:302021-05-10T04:09:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क उमरेड : पेंच व्याघ्र प्रकल्पात मुख्य वनसरंक्षक पदावर कर्तव्यावर असताना एम. श्रीनिवास रेड्डी यांना नागपूरपासून ४५ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरेड : पेंच व्याघ्र प्रकल्पात मुख्य वनसरंक्षक पदावर कर्तव्यावर असताना एम. श्रीनिवास रेड्डी यांना नागपूरपासून ४५ किमी अंतरावर असलेल्या उमरेड-कऱ्हांडला-पवनी अभयारण्याचा लय भारी ‘लळा’ होता. पेंच व्याघ्र प्रकल्पांतर्गत टिपेश्वर, मानसिंग देव आणि उमरेड-कऱ्हांडला-पवनी हे तीन अभयारण्य तसेच बोर आणि पेंच हे दोन व्याघ्र प्रकल्प असा संपूर्ण विस्तार होता. या पाच प्रकल्पाचे ‘बॉस’ श्रीनिवास होते. ‘बॉस’ अभयारण्याच्या दिशेने निघाले की, इकडली चांडाळचौकडी संपूर्ण तयारीनिशी सज्ज असायची. उमरेड परिसर ‘सावजी तडका’साठी प्रसिद्ध आहे, शिवाय दारूचा पूरही प्रचंड वाहतो. कधी नवेगाव साधू येथील विश्रामगृहावर तर कधी रिसॉर्टवर वन्यजीवप्रेमी साहेब लोकांची ‘संपूर्ण आणि परिपूर्ण’ व्यवस्था करीत असत. कदाचित या आदरातिथ्याच्याच प्रेमात ‘श्रीनिवास’ अडकले होते की काय, अशी चर्चा आता सर्वदूर सुरू आहे.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे निलंबित अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक एम. श्रीनिवास रेड्डी यांना बहुचर्चित दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी अटक झाल्यानंतर त्यांच्या विविध दौऱ्यांची खमंग चर्चा परिसरातही रंगू लागली आहे. अतिशय तापट, मी म्हणेल तो कायदा आणि उर्मट बोलीभाषेमुळे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा थरकापच उडत असे, असेही आता बोलले जात आहे. श्रीनिवास यांच्या नेतृत्वात करोडो रुपयांची कामे झाली खरी, परंतु त्यातही सखोल चौकशी झाल्यास बरीच ‘लबाडी’ उघडकीस येऊ शकेल.
.....
जैसे ज्याचे कर्म तैसे...
‘लोकमत’ने दिनांक ७ मे रोजीच्या अंकात ‘एक होता ‘श्रीनिवास’ नावाचा वाघ!’ या शीर्षकाखाली वृत्त प्रकाशित करताच अनेकांच्या पायाखालची वाळूच सरकली. सोशल मीडियावर संताप व्यक्त झाला. मानद वन्यजीव रक्षक रोहित कारू यांनी तर ‘जैसे ज्याचे कर्म तैसे, फळ देतो ईश्वर’ अशी सडेतोड प्रतिक्रिया व्यक्त करीत श्रीनिवासच्या बाबतीत तसच घडलं, असा खुलेआम रोखठोक शब्दात राग आळवला.
.....
अप्पर प्रधान झाले
वने आणि वन्यजीव विभागात अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक हे पद पूर्वी नव्हते. पेंचमध्ये मुख्य वनसंरक्षक असतानाच अचानकपणे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक या पदाची निर्मिती करण्यात आली. मुख्य वनसंरक्षक असलेले एम. श्रीनिवास रेड्डी हे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक बनले. राज्यात अशा आलिशान पदाच्या कारभाराचा अधिकारी कुणीही नव्हता आणि नाही. खास मंत्रालयातून आपल्या चेलेचपाट्यांच्या आणि बड्यांना सोबतीला घेत श्रीनिवास यांनीच ही फिल्डिंग लावली, असे दबक्या आवाजात व्यक्त होत आहे.