फाईट शुरू है... जिंदगीसे लढ रहा हूं...! हिमांशु रॉय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 09:55 AM2018-05-12T09:55:44+5:302018-05-12T09:55:44+5:30
फाईट शुरू है...जिंदगीसे लढ रहां हूं... देखते है क्या होता है..., असे भावनिक उद्गार माजी एटीएस प्रमुख हिमांशु रॉय यांनी आठ दिवसांपूर्वी आपल्या कौटुंबिक मित्राच्या परिवारातील सदस्यांसोबत बोलताना काढले होते.
नरेश डोंगरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : फाईट शुरू है...जिंदगीसे लढ रहां हूं... देखते है क्या होता है..., असे भावनिक उद्गार माजी एटीएस प्रमुख हिमांशु रॉय यांनी आठ दिवसांपूर्वी आपल्या कौटुंबिक मित्राच्या परिवारातील सदस्यांसोबत बोलताना काढले होते. दोन वर्षांपासून दुर्धर आजाराशी लढणारे रॉय त्यावेळी जीवनाचा लढा असा संपवेल, अशी कल्पनादेखील त्यांच्या स्वकियांनी केली नव्हती. शुक्रवारी दुपारी रॉय यांनी आत्महत्या केल्याचे वृत्त राज्याच्या पोलीस दलात वायुवेगाने पोहचले. हे वृत्त येथील पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांना जबर मानसिक धक्का बसवणारे ठरले. आठ दिवसांपूर्वी परिवारातील सदस्यांशी बोलताना काढलेल्या रॉय यांच्या त्या उद्गारामागे दडलेली व्यथाही पुढे आली. डॉ. व्यंकटेशम यांचे हिमांशु रॉय यांच्याशी मित्रत्वाचेच नव्हे तर घनिष्ट कौटुंबिक संबंध आहेत, हे विशेष!
पोलीस दलातील ‘टायगर’, ‘रिअल हिरो’ मानले जाणारे, पोलीस महासंचालक हिमांशु रॉय यांचा नागपूर-विदर्भाशी प्रत्यक्ष संबंध आला नाही. मात्र, त्यांचे जीवाभावाचे मित्र, अनेक ठिकाणी सोबत काम करणारे डॉ. व्यंकटेशम नागपुरात पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. अत्यंत धाडसी अन् पोलीस दलात ‘मसल्स मॅन’ म्हणून ओळख असलेले रॉय कसे सौजन्यशील होते, त्याच्या अनेक आठवणी डॉ. व्यंकटेशम यांनी सांगितल्या.
त्यांच्या बोलण्यावागण्यात एवढी आपुलकी होती की, व्यक्ती कितीही रागात असली तरी रॉय त्याला जिंकून घ्यायचे. महाराराष्ट्रात जातीय दंग्याची पार्श्वभूमी असलेले मालेगाव अत्यंत संवेदनशील शहर मानले जाते. १९९१-९२ ला हिमांशु रॉय तेथे सहायक पोलीस अधीक्षक, तर डॉ. व्यंकटेशम अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होते. रामजन्मभूमी-बाबरी मशिदीच्या संबंधाने सर्वत्र वातावरण तणावपूर्ण होते. मालेगावातील वातावरण तर जास्तच स्फोटक होते.
मात्र, हिमांशु रॉय यांनी तेथील नागरिकांना असे काही विश्वासात घेतले, त्यांच्याशी असा काही संवाद साधला की, त्यावेळी मालेगावात जातीय दंगा घडला नाही. हेच काय, रॉय कार्यरत असेपर्यंत मालेगावात जातीय दंग्याची मोठी,अनुचित घटना घडली नाही.
मुंबई हल्ल्यानंतर रॉय यांनी भारतावर वाकडी नजर ठेवणाऱ्यांच्या हातचे बाहुले बनलेल्या अनेक दहशतवाद्यांकडून अत्यंत महत्त्वाची माहिती काढून घेतली होती. पुन्हा असा हल्ला होणार नाही, यासाठी त्यांनी स्वत:च एक अॅक्शन प्लॅन तयार केला होता. त्यामुळे ते खूपच आत्मविश्वासाने म्हणत होते की, मी मुंबईत असेपर्यंत आता कुणी मुंबईकडे वाकड्या नजरेने पाहू शकणार नाही. त्यांनी आपला हा आत्मविश्वास प्रसारमाध्यमाला दिलेल्या मुलाखतीतूनही बोलून दाखवला होता.
तासन्तास जीममध्ये घाम गाळून दणकट शरीरयष्टी कमावणाऱ्या रॉय यांना हाडाचा कॅन्सर झाल्याने ते दोन वर्षांपासून आयुष्यासोबत संघर्ष करीत होते. वर्षभरापूर्वी डॉ. व्यंकटेशम यांच्यासोबत त्यांची अखेरची भेट झाली होती. जबाबदारीचे पद अन् वेगळ्या ठिकाणी वास्तव्य असल्याने नंतर या दोन मित्रांची गळाभेट झाली नाही. मात्र, कौटुंबिक संबंध असल्याने रॉय यांच्याशी आणि त्यांच्या परिवारातील सदस्यांसोबत त्यांचा अधूनमधून फोनवर संपर्क होत होता.
डॉ. व्यंकटेशम यांच्या परिवारातील सदस्यांनी आठ दिवसांपूर्वी हिमांशु रॉय यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. बराच वेळ बोलणे झाले.
पारिवारीक घडामोडींच्या माहितीची देवाणघेवाण केल्यानंतर व्यंकटेशम परिवारातील सदस्यांकडून हिमांशु रॉय यांना शेवटचा व्यक्तिगत प्रश्न होता. ‘ अब कैसे हो... कैसे चल रहा है...?, त्यावर रॉय यांचे उत्तर होते.... फाईट शुरू है... जिंदगीसे लढ रहा हूं... देखते है क्या होता है...! रॉय यांच्या या वाक्यातील आंतरिक वेदना त्यावेळी लक्षात आली नाही. मात्र, हा रिअल हिरो जीवनाशी लढताना मनोमन हरल्याचे संकेत त्याचवेळी देऊन गेला होता, हे आता स्पष्ट झाले आहे.