नागपूर पदवीधरच्या रिंगणात १९ उमेदवारांमध्ये लढत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2020 20:56 IST2020-11-17T20:53:11+5:302020-11-17T20:56:58+5:30
Nagpur News विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील उमेदवारांचे चित्र मंगळवारी स्पष्ट झाले. मंगळवारी सात उमेदवारांनी अर्ज वापस घेतले व आता निवडणुकीच्या रिंगणात १९ जण उरले आहेत.

नागपूर पदवीधरच्या रिंगणात १९ उमेदवारांमध्ये लढत
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील उमेदवारांचे चित्र मंगळवारी स्पष्ट झाले. मंगळवारी सात उमेदवारांनी अर्ज वापस घेतले व आता निवडणुकीच्या रिंगणात १९ जण उरले आहेत. पुढील काही दिवसांत जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचणे हे उमेदवारांसमोरील मोठे आव्हान ठरणार आहे.
पदवीधर मतदारसंघासाठी एकूण ३१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. पाच उमेदवारांचे अर्ज अपात्र ठरल्याने २६ उमेदवार उरले होते. मंगळवारी अर्ज वापस घेण्याची अखेरची तारीख होती व यातील सात उमेदवारांनी मंगळवारी माघार घेतली. त्यामुळे आता १९ उमेदवारांमध्ये शर्यत राहणार आहे. मंगळवारी अर्ज मागे घेणाऱ्यांमध्ये लोकभारतीचे किशोर वरंभे, अपक्ष उमेदवार संदीप रमेश जोशी, गोकुलदास पांडे, धर्मेश फुसाटे, रामराव चव्हाण, शिवाजी सोनसरे, सच्चिदानंद फुलेकर यांचा समावेश आहे.
आता रिंगणात कॉंग्रेसचे अभिजीत वंजारी, भाजपचे संदीप जोशी यांच्यासह रिपा (खो)चे राजेंद्र चौधरी, वंचित बहुजन आघाडीचे राहुल वानखेडे, मानवाधिकार पक्षाच्या अॅड. सुनीता पाटील व विदर्भवादी संघटनांंचे नितीन रोंघे हे प्रमुख उमेदवार आहेत.
याशिवाय अजय तायवाडे, अतुलकुमार खोब्रागडे, अमित मेश्राम, नीतेश कराळे, प्रकाश रामटेके, प्रशांत डेकाटे, मो. शाकिर, राजेंद्र भुतड़ा, विनोद राऊत, वीरेंद्र कुमार जायस्वाल, शरद जीवतोड़े, संगीता बढ़े, संजय नासरे हे अपक्षदेखील आहेत.
प्रचार करताना दमछाक
नागपूर पदवीधर मतदारसंघाचे क्षेत्र हे मोठे आहे. इतक्या मोठ्या कार्यक्षेत्रात जाऊन प्रचार करताना उमेदवारांचा कस लागत आहे. खऱ्या अर्थाने उमेदवारांना प्रचारासाठी कमी कालावधी मिळाला आहे. त्यामुळे अनेक जण ‘ऑनलाईन’ माध्यमातूनदेखील मतदारांपर्यंत पोहोचत आहेत.