पत्नीची छेड काढणाऱ्याला दगडाने ठेचले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2021 07:36 PM2021-12-20T19:36:52+5:302021-12-20T19:43:54+5:30
Nagpur News पत्नीची छेड काढणाऱ्याला त्याच्या शेजाऱ्याने विटेने ठेचून ठार मारण्याचा प्रयत्न केला. यात अमर मधुकर वानखेडे (वय ४०) हा गंभीर जखमी झाला. यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी रात्री ही घटना घडली.
नागपूर - पत्नीची छेड काढणाऱ्याला त्याच्या शेजाऱ्याने विटेने ठेचून ठार मारण्याचा प्रयत्न केला. यात अमर मधुकर वानखेडे (वय ४०) हा गंभीर जखमी झाला. यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी रात्री ही घटना घडली.
पोलिसांच्या माहितीनुसार, जखमी वानखेडे यशोधरानगरातील इंदिरा माता नगरात राहतो. त्याला दारूचे व्यसन आहे. दारूच्या नशेत पत्नीसोबत नेहमी वाद घालत असल्याने त्याची पत्नी महिनाभरापूर्वी माहेरी निघून गेली. तेव्हापासून वानखेडे एकटाच घरी राहात होता. त्याच्या शेजारीच आरोपी राज उर्फ राजकुमार आनंद पराते राहतो. तो दिवसभर कबाड गोळा करतो. आरोपी पराते आणि वानखेडेत मैत्री होती. अनेकदा ते एकत्र दारू प्यायचे. जेव्हा केव्हा त्यांची बैठक जमायची तेव्हा वानखेडे परातेच्या पत्नीचा विषय काढत होता. तुझी बायको खूप सुंदर आहे, असे तो म्हणायचा. त्यावर परातेने त्याला यापुढे विषय काढायचा नाही, असे समजावले होते.
१५ दिवसांपूर्वी वानखेडेने परातेच्या पत्नीला ‘खूप सुंदर दिसतेस’ म्हटले होते. त्यावेळी तिनेही वानखेडेची खरडपट्टी काढून त्याला यानंतर असे बोलणे खपवून घेतले जाणार नाही, असा ईशारा दिला होता. ही गोष्ट परातेला कळल्यानंतर परातेने वानखेडेसोबत बोलचाल बंद केली होती. रविवारी रात्री पंचवटीनगरातील एनआयटी गार्डनजवळ दारूच्या नशेत असलेल्या वानखेडेची परातेशी भेट झाली. यावेळी त्याने पुन्हा तोच विषय काढून वाद वाढवला. त्यामुळे संतप्त झालेल्या परातेने वानखेडेला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तो खाली पडल्यानंतर बाजूची विट उचलून त्याच्या डोक्यावर, तोंडावर मारून त्याला गंभीर जखमी केले. तो गार्डनजवळ पडून असल्याचे कळाल्यानंतर यशोधरानगर पोलिसांनी त्याला मेयोत दाखल केले. अंमलदार गणेश वंजारी यांच्या तक्रारीरवरून हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी शोधला आरोपी
वानखेडे बयान देण्याच्या अवस्थेत नव्हता. त्यामुळे त्याचे नाव स्पष्ट झाले नव्हते. यशोधरानगरचे ठाणेदार संजय जाधव यांनी सोमवारी दिवसभर शोधाशोध करून जखमी कोण, कुठला ते शोधून काढले. त्यानंतर त्याच्या हत्येचा प्रयत्न करणारा आरोपी राज पराते यालाही रात्री हुडकून काढले. वृत्त लिहिस्तोवर त्याला अटक करण्याची प्रक्रिया सुरू होती.
----