नागपुरातील वाडी पोलीस ठाण्यासमोर तृतीयपंथियांनी घातला गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2020 02:40 PM2020-02-08T14:40:50+5:302020-02-08T14:42:41+5:30
उपराजधानीत तृतीयपंथियांचे तीन गट आहेत. त्यातील दोन गटात वर्चस्वाची वर्षभरापासून लढाई सुरू असून, ते आपल्या क्षेत्रात फेरी (पैसे) मागायला येणा-या विरोधी गटातील तृतीयपंथियांना तीव्र विरोध करतात.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पैसे गोळा करण्याच्या वादातून तृतीयपंथियांच्या दोन गटात चक्क पोलीस ठाण्याच्या गेटसमोरच जोरदार हाणामारी झाली. एकमेकांना मारहाण केल्यानंतर एकाने विवस्त्र होऊन पोलिसांकडे कपडे भिरकावले. शनिवारी दुपारी ११.३० च्या सुमारास ही घटना घडल्याने परिसरात प्रचंड खळबळ निर्माण झाली होती.
उपराजधानीत तृतीयपंथियांचे तीन गट आहेत. त्यातील दोन गटात वर्चस्वाची वर्षभरापासून लढाई सुरू असून, ते आपल्या क्षेत्रात फेरी (पैसे) मागायला येणा-या विरोधी गटातील तृतीयपंथियांना तीव्र विरोध करतात. नुसता विरोधच करत नाही तर एकमेकांवर हल्ला चढवणे, कपडे फाडणे, असेही प्रकार नेहमीच त्यांच्यात घडतात. गेल्या दोन वर्षांत त्यांच्यातील वैमनस्य टोकाचे झाले आहे. या पार्श्वभूमीवर, गेल्या वर्षी एका गटाने दुस-या गटाची प्रमुख चमचम हिची हत्याही केली होती. तेव्हापासून त्यांच्यातील हाणामा-या थांबल्या असल्या तरी धूसफूस सुरूच आहे. काटोल नाका परिसरात गेल्या तीन दिवसांपासून हे दोन गट एकमेकांवर हल्ले चढवत आहेत. या पार्श्वभूमीवर शनिवारी वाडी पोलीस ठाण्याच्या गेटसमोर ते समोरासमोर आले. त्यांनी एकमेकांना बदडले. पोलीस ठाण्यासमोर सुरू असलेला त्यांचा गोंधळ पाहून काही पोलीस धावले. त्यांनी तीन - चार जणांना आतमध्ये नेले तर बाहेर असलेल्या एकाने विवस्त्र होऊन पोलिसांकडे कपडे भिरकावले. पोलिसांच्या नावाने शिमगाही केला. राष्ट्रीय महामार्गावर वाडी पोलीस ठाणे आहे. या ठाण्यातील कारभार अधूनमधून नेहमीच चर्चेला येतो. शनिवारी तो या प्रकारामुळे चर्चेला आला अन् एकच खळबळ उडाली. अल्पावधीतच ठाण्यासमोर मोठी गर्दी जमली. वृत्त लिहिस्तोवर दोन्ही गटावर गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू असल्याचे पोलीस सांगत होते.