विद्यार्थिनीशी मैत्रीच्या वादातून दोन गटांत हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:08 AM2021-02-10T04:08:57+5:302021-02-10T04:08:57+5:30
नागपूर : अल्पवयीन विद्यार्थिनीशी मैत्री करण्याच्या वादातून दोन गटांत वाद झाला. याचे पर्यवसान हाणामारीत होऊन चार जण जखमी झाले. ...
नागपूर : अल्पवयीन विद्यार्थिनीशी मैत्री करण्याच्या वादातून दोन गटांत वाद झाला. याचे पर्यवसान हाणामारीत होऊन चार जण जखमी झाले. ही घटना सोमवारी रात्री एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.
या घटनेत १६ वर्षांच्या एका मुलाने आपल्याच वयाच्या मुलीशी मोबाइलवरून कॉल करून मैत्री करण्यास सांगितले. मात्र तिने नकार दिल्यावर त्याने व्हॉट्सॲप मेसेज पाठविणे सुरू केले. हा प्रकार घरी कळल्यावर मुलीच्या भावाने आणि त्याच्या मित्रांनी त्या मुलाला बोलावले आणि यापुढे त्रास न देण्याची तंबी दिली. त्या मुलाला याचा राग आला. त्याने आपला भाऊ आणि मित्रांना बोलावले. पडोळे ले-आउटजवळच्या मैदानावर मुलीचा भाऊ आणि त्याचे मित्र चर्चा करीत असताना रात्री ९.३० वाजता आपला मित्र बाळू मोरे, रंजिता मोरे, गौरव मोरे यांच्यासोबत येऊन त्यांना लाठी-काठ्यांनी मारहाण केली. यात मुलीचा भाऊ तसेच सागर यादव, यश तिडके हे गंभीर जखमी झाले. याचा बदला घेण्यासाठी यशने आपला भाऊ तसेच सुशांत दिवे, प्रशांत दिवे यांना बोलावले. त्यांनी मुलाचा सहकारी बाळू मोरे, त्यांचा मुलगा, पुतण्या, पत्नीसोबत वाद घातला. भांडण सोडविण्यासाठी आलेल्या महिलेला जखमी केले. एमआयडीसी पोलिसांनी दोन्ही गटांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.