संजय राऊत यांच्याविरुद्ध अॅट्रोसिटी दाखल करा; नवनीत राणांची मागणी, पोलिसांना निवेदन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2022 07:22 PM2022-04-26T19:22:02+5:302022-04-26T19:27:03+5:30
नवनीत राणांच्या स्वीय सहायकाचे पोलिस आयुक्तांना निवेदन
नागपूर- आपण मागासवर्गिय असल्यामुळे आपल्याला मुद्दामहून हिनवल्या जाणारी भाषा वापरली जाते, असा आरोप करून खासदार नवनीत राणा यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर अॅट्रोसिटी लावण्याची मागणी केली आहे. खासदार नवनीत राणा यांच्या वतिने त्यांचे खासगी स्वीय सहायक विनोद गुहे यांनी हे निवेदन पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांना मंगळवारी दिले.
खासदार राणा यांच्या वतिने देण्यात आलेल्या या दोन पानी निवेदनात २०१४ पासूनच्या लोकसभा निवडणूकीपासूनचे वेगवेगळे संदर्भ देण्यात आले आहे. आपण मागसवर्गिय असल्यामुळेच मुद्दामहून आपल्याला शिवसैनिक खोट्या केसेस करून टोमणे मारत असल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे. शिवसेना नेते राऊत यांनी विविध वृत्त वाहिन्यांना मुलाखती देताना आम्हा दाम्पत्याला वारंवार बंटी बबली, ४२० संबोधून आमची समाजात बदनामी केल्याचे या तक्रारवजा निवेदनात नमूद केले आहे.
मुंबईतील खार मधील निवासस्थानावर शिवसैनिक पाठवून घराबाहेर पडण्यास मज्जाव केल्याचे आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही त्यात म्हटले आहे. या निवेदनासोबतच गुहे यांनी पोलीस आयुक्तांना पुरावा म्हणून एक पेन ड्राईव्हही दिला आहे. राणा यांच्या वतिने देण्यात आलेले हे निवेदन पोलीस आयुक्तांनी स्विकारले.
चौकशी करीत आहोत - अमितेशकुमार
या संबंधाने पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्याशी संपर्क केला असता निवेदनातील आरोप तसेच मागणीच्या संबंधाने पोलीस चौकशी करीत असल्याचे अमितेशकुमार यांनी लोकमतला सांगितले.