'फाईल'ने लावले एसटीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यात 'भांडण'; महिलेची तक्रार, साहेबांचा इनकार
By नरेश डोंगरे | Published: August 12, 2023 02:16 PM2023-08-12T14:16:29+5:302023-08-12T14:18:36+5:30
वरिष्ठांकडून चौकशी सुरू
नरेश डोंगरे
नागपूर : राज्य परिवहन (एसटी) महामंडळात कार्यरत असलेले एक साहेब गाडीत बसत असताना कर्मचारी महिलेने त्यांच्यासमोर सह्यासाठी फाईल धरल्याने या दोघांमध्ये वाद झाला. हा वाद तक्रारीच्या रुपात वरिष्ठांकडे पोहचला. महिलेची तक्रार असल्यामुळे वरिष्ठांकडून आता या प्रकरणात चाैकशी केली जात आहे.
हे साहेब एसटी महामंडळाच्या नागपूर विभागात विभाग नियंत्रक म्हणून कार्यरत आहेत. तर, महिला त्या कार्यालात कर्मचारी म्हणून सेवारत आहे. दोन दिवसांपूर्वी ही महिला एका फाईलवर सह्या घेण्यासाठी साहेबांकडे गेली. साहेब त्या वेळी बाहेर जाण्यासाठी निघाले आणि गाडीत बसले होते. अर्जंट आहे म्हणत कर्मचारी महिलेने साहेबांच्या समोर फाईल धरली. यावर साहेब नाराज झाले. 'कुठे सह्या घ्यायच्या, तुम्हाला कळत नाही का, म्हणत त्यांनी जरा आवाज मोठा केला. त्यावर महिलेने आक्षेप घेतला. त्यातून या दोघांमध्ये वाद झाला.
चार चाैघांसमोर झापल्यामुळे अपमाणित झाल्याची भावना झाल्याने महिला कर्मचाऱ्याने आपल्या वरिष्ठांकडे लेखी तक्रार दिली. या तक्रारीची दखल घेत एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चाैकशीसाठी एक समिती गठित केली. चाैकशी समितीकडून आतापर्यंत चार ते पाच जणांचे बयाण नोंदविण्यात आले आहे. दरम्यान, महिला कर्मचारी आणि अधिकाऱ्यामध्ये झालेल्या या वादाची एसटी महामंडळाच्या नागपूर विभागात उलटसुलट चर्चा आहे. या संबंधाने अधिक माहिती जाणून घेण्यासाठी प्रयत्न केला असता तक्रार करणारी महिला आणि संबंधित अधिकारी काही बोलायला तयार नसल्याचे स्पष्ट झाले.
चौकशी सुरू आहे : उपमहाव्यवस्थापक
या संबंधाने एसटी महामंडळाचे उपमहाव्यवस्थापक श्रीकांत गभणे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी संबंधित महिलेच्या तक्रारीची दखल घेण्यात आली असून चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.