दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:08 AM2021-01-22T04:08:21+5:302021-01-22T04:08:21+5:30

नागपूर : मेडिकलमधील ऑक्सिजनअभावी तीन रुग्णांच्या मृत्यू प्रकरणाची राज्यस्तरीय चौकशी सुरू असताना मृताच्या नातेवाईकांनी अजनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल ...

File a homicide charge against the culprits | दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

Next

नागपूर : मेडिकलमधील ऑक्सिजनअभावी तीन रुग्णांच्या मृत्यू प्रकरणाची राज्यस्तरीय चौकशी सुरू असताना मृताच्या नातेवाईकांनी अजनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. यामुळे रुग्णालय प्रशासनाचे धाबे दणाणले असून सारवासारव करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) ट्रॉमा केअर सेंटरमधील ‘अतिदक्षता विभाग-१’मधील ऑक्सिजनचा पुरवठा १७ जानेवारी रोजी पहाटे अचानक बंद झाल्याने अर्ध्या तासाच्या अंतराने तीन रुग्णांचा मृत्यू झाला. या घटनेने राज्यात खळबळ उडाली. वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी याची गंभीर दखल घेत मेडिकलबाहेरील तीन सदस्यांची चौकशी समितीची स्थापना केली. यात अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) औषधवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. पी.पी. जोशी, अकोला मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. कुसुमागर घोरपडे व गोंदिया मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. नरेंद्र तिरपुडे आदींचा समावेश आहे. बुधवारी या समितीच्या सदस्यांनी ट्रॉमा केअर सेंटरला भेट दिली. लवकरच ते आपला अहवाल डॉ. लहाने यांच्याकडे सुपूर्द करणार आहेत.

दरम्यान, मृताचा मुलगा नेहाल नरेश मून यांनी २० जानेवारी रोजी अजनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यात म्हटले आहे की, साडेचार तासात मेडिकलमध्ये वडिलांचा मृत्यू झाला. सकाळी ५.३० वाजता मृत्यूची माहिती डॉक्टरांनी दिली. परंतु कोरोनाच्या तपासणीचा अहवाल येईपर्यंत थांबण्यास सांगितले. दुपारी ३.३० वाजता निगेटिव्ह अहवाल येऊनही शवविच्छेदन केले नाही. यामुळे निष्काळजीपणामुळे वडिलांचा मृत्यू झाला, हे स्पष्ट होते. रुग्णालयातील दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही त्यांनी केली. प्राप्त माहितीनुसार, मेडिकलच्या चार सदस्यीय चौकशी समितीने आपला अहवाल अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांच्याकडे सुपूर्द केला आहे. परंतु त्याची माहिती समोर आलेली नाही.

-चौकशी सुरू आहे

मेडिकलमधील ऑक्सिजनअभावी तीन रुग्णांच्या मृत्यू प्रकरणाची राज्यस्तरीय चौकशी सुरू आहे. अद्यापही अहवाल प्राप्त झालेला नाही.

-डॉ. तात्याराव लहाने

संचालक, वैद्यकीय शिक्षण विभाग

Web Title: File a homicide charge against the culprits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.