बजाजनगर पोलीस ठाण्यातील लाचखोर शिपायाविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 12:08 AM2020-08-13T00:08:21+5:302020-08-13T00:09:42+5:30

अ‍ॅन्टी करप्शन ब्युरो (एसीबी)ने बजाजनगर पोलीस ठाण्यातील नायक शिपायाविरुद्ध लाच मागितल्याचा गुन्हा दाखल केला आहे. एसीबी कारवाई करणार असल्याचा सुगावा लागताच आरोपी नायक शिपाई प्रफुल्ल पवार फरार झाला. या प्रकरणात अधिकारीही सामील असल्याच्या चर्चेमुळे ठाण्यात खळबळ उडाली आहे.

Filed a case against a corrupt constable of Bajajnagar police station | बजाजनगर पोलीस ठाण्यातील लाचखोर शिपायाविरुद्ध गुन्हा दाखल

बजाजनगर पोलीस ठाण्यातील लाचखोर शिपायाविरुद्ध गुन्हा दाखल

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अ‍ॅन्टी करप्शन ब्युरो (एसीबी)ने बजाजनगर पोलीस ठाण्यातील नायक शिपायाविरुद्ध लाच मागितल्याचा गुन्हा दाखल केला आहे. एसीबी कारवाई करणार असल्याचा सुगावा लागताच आरोपी नायक शिपाई प्रफुल्ल पवार फरार झाला. या प्रकरणात अधिकारीही सामील असल्याच्या चर्चेमुळे ठाण्यात खळबळ उडाली आहे.
तक्रारकर्त्या युवकाने एका सावकाराकडून बाईक गहाण ठेवून कर्ज घेतले होते. कर्ज आणि व्याज परत केल्यानंतरही बाईक परत न केल्यामुळे तो दुखावला होता. त्याने आपल्या दोन साथीदाराच्या मदतीने काही दिवसापूर्वी सावकाराच्या घरी जाऊन आपली बाईक परत आली. सावकाराने बजाजनगर पोलिसांकडे बाईक चोरीची तक्रार केली. प्रफुल्लने याचा तपास सुरू केला. तेव्हा त्याला सीसीटीव्हीमध्ये तक्रारकर्ता युवक आपल्या दोन साथीदाराच्या मदतीने बाईक घेऊन जाताना दिसून आला. प्रफुल्लने तक्रारकर्त्यास शोधून काढले. त्याला चोरीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. तक्रारकर्त्याने प्रफुल्लला सांगितले की, बाईक त्याच्या मालकीची आहे. व्याज व मूळ रक्कम परत केल्यानंतरही अवैध सावकार त्याची बाईक परत करीत नव्हता.
ही गोष्ट ऐकल्यानंतरही प्रफुल्लने गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला. गुन्हा दाखल न करण्याच्या मोबदल्यात त्याला ५० हजार रुपये मागितले. युवकाने एसीबीकडे याची तक्रार केली. प्राथमिक चौकशीत लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. प्रफुल्लला पकडण्यासाठी योजना आखण्यात आली. तीन-चार दिवसांपासून एसीबी प्रफुल्लला पकडण्याच्या तयारीत होते. परंतु त्याला एसीबीच्या कारवाईचा सुगावा लागल्याने तो पैसे घेण्यास मागेपुढे पाहात होता. बुधवारी पुन्हा प्रयत्न केला असता प्रफुल्ल ठाण्यातून पळून गेला. एसीबीने कारवाई केल्याची माहिती होताच ठाण्यात खळबळ उडाली. रात्री उशिरापर्यंत प्रफुल्ल पोलिसांच्या हाती लागला नव्हता. प्रफुल्ल अधिकाऱ्यांचा खूप जवळचा असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या भूमिकेचीही चौकशी केली जात आहे.
 

Web Title: Filed a case against a corrupt constable of Bajajnagar police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.