कुख्यात सतीश बघेलविरुद्ध अखेर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:06 AM2021-07-05T04:06:24+5:302021-07-05T04:06:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : प्रधानमंत्री आवास योजनेत स्वस्तात घर मिळवून देण्याची थाप मारून शेकडो जणांना गंडविणारा कुख्यात गुन्हेगार ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रधानमंत्री आवास योजनेत स्वस्तात घर मिळवून देण्याची थाप मारून शेकडो जणांना गंडविणारा कुख्यात गुन्हेगार सतीश रामकृपालसिंग बघेल (वय ४५, रा. धम्मदीपनगर) याच्याविरुद्ध अखेर यशोधरानगर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
आरोपी बघेल हा कुख्यात गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याने यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अनेक वस्त्यांमध्ये राहणाऱ्या गोरगरिबांना वांजरा भागात प्रधानमंत्री आवास योजनेत घर मिळवून देतो, असे आमिष दाखवले. आपली वरिष्ठ अधिकाऱ्यांशी थेट ओळख आहे. त्यांना पैसे खाऊ घातल्यास सहज काम होते, अशी बतावणी करून १ जून २०१९ पासून अनेकांना स्वत:च्या घराचे स्वप्न दाखवले. त्या बदल्यात शेकडो जणांकडून लाखो रुपये गोळा केले. बदल्यात घराच्या ताबापत्राची बनावट कागदपत्रेही अनेकांना दाखवली. तुम्हाला ३० जूनला घराचा ताबा देतो, तुम्ही चावी घ्यायला या, असे सांगितल्यामुळे अनेकांनी भाड्याचे घर खाली केेले आणि ३० जूनला आपले सामान घेऊन बाहेर पडले. इकडे बघेल मात्र गायब झाला. त्यामुळे त्याच्याकडे लाखो रुपये देणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर, संतप्त पीडितांनी यशोधरानगर ठाण्यात धाव घेतली. मात्र, पोलिसांनी पीडितांना वाटाण्याच्या अक्षता लावून परत केले. तीन दिवसांपासून पोलीस कारवाई करत नसल्याने संतप्त झालेल्या पीडितांनी
पोलीस उपायुक्त नीलोत्पल यांच्याकडे धाव घेतली. त्यांनी त्याची गंभीर दखल घेतली. यामुळे मोहम्मद
अल्ताफ अब्दुल मुनाफ कुरेशी (वय ३८, रा. माजरी रेल्वे क्रॉसिंगजवळ) यांची तक्रार नोंदवून घेत बघेलविरुद्ध शनिवारी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. बघेलने ५९ लाख ५४ हजार रुपये हडपल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघड झाले आहे. हा आकडा फुगूही शकतो, असे चाैकशी अधिकारी सांगतात.
---
पोलिसांवरही रोष
शेकडो गोरगरिबांची फसवणूक करणाऱ्या कुख्यात बघेलचे यशोधरानगर पोलीस ठाण्यातील एका कर्मचाऱ्यासोबत मधुर संबंध आहेत. त्याचमुळे पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यास तीन दिवस टाळाटाळ केली. वेळीच पोलिसांनी दखल घेतली असती तर आरोपी बघेल ३० जूनलाच पोलिसांच्या हाती लागला असता, असा पीडितांचा आरोप आहे.
----