मनरेगाच्या राेजगार सेवकावर अपहाराचा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:11 AM2021-08-23T04:11:18+5:302021-08-23T04:11:18+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क उमरेड : तालुक्यातील निरव्हा ग्रामपंचायतअंतर्गत येणाऱ्या सोनपुरी येथील मनरेगाच्या कामात अपहार केल्याप्रकरणी या योजनेच्या ग्राम रोजगार ...

Filed a case of embezzlement against a MGNREGA employee | मनरेगाच्या राेजगार सेवकावर अपहाराचा गुन्हा दाखल

मनरेगाच्या राेजगार सेवकावर अपहाराचा गुन्हा दाखल

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

उमरेड : तालुक्यातील निरव्हा ग्रामपंचायतअंतर्गत येणाऱ्या सोनपुरी येथील मनरेगाच्या कामात अपहार केल्याप्रकरणी या योजनेच्या ग्राम रोजगार सेवकावर कुही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योगेश बंडू ठाकरे (३२, रा. सोनपुरी) असे आरोपीचे नाव आहे.

सन २०१३ ते २०१६ दरम्यान सोनपुरी येथे मनरेगाअंतर्गत वृक्ष लागवडीचे काम झाले होते. हजेरीपटावर बोगस हजेरी दाखविण्याचा प्रकार योगेश ठाकरे यांनी केला, असे तक्रारीत नमूद आहे. या बोगस हजेरीत काही गावकऱ्यांसह आपल्या जवळच्या नातेवाईकांनाही ठाकरे याने कामावर दाखवून शासनाला चुना लावला.

याप्रकरणी एकूण ५०,५२० रुपयांचा अपहार केल्याचीही नोंद करण्यात आली आहे. कुही पोलीस ठाण्यात भादंवि ४२० कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निरव्हा ग्रामपंचायतच्या सचिव वीणा कांबळे यांनी याप्रकरणी फिर्याद नोंदविली आहे. कुहीचे ठाणेदार चंद्रकांत मदने यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक कमलेश सोनटक्के करीत आहेत. याप्रकरणात गुन्हा दाखल होताच एकच खळबळ उडाली आहे.

....

मनरेगाच्या कामावर नवरदेव

लग्नकार्य असतानासुद्धा मंडपपूजन आणि लग्नाच्या दिवशी कुटुंबातील सदस्यांना मनरेगाच्या कामावर दाखविल्या गेले. ही अफलातून बाबसुद्धा चौकशीअंती चव्हाट्यावर आली. विशेषत: नवरदेवसुद्धा मनरेगाच्या कामावर होता, असेही कागदी घोडे नाचविल्या गेलेत. आरोपी ग्राम रोजगार सेवक योगेश ठाकरे याने एकूण ८१६ दिवसांची बोगस हजेरी दाखल्याचेही घबाड चौकशीत उजेडात आले.

....

‘लोकमत’ने वाचा फोडली

सर्वप्रथम ४ ऑगस्ट २०१६ ला सोनपुरी येथील राहुल तागडे या तरुणाने या अपहारप्रकरणी उमरेड पंचायत समितीकडे तक्रार केली होती. चौकशी सुरू झाली. काही दिवसात प्रकरण थंडबस्त्यात अडकले. कालांतराने जिल्हा तक्रार निवारण प्राधिकारी व मंत्रालयाकडे राहुल तागडे यांनी धाव घेतली. त्यानंतरही चौकशीला तब्बल चार वर्षे लागली, हे येथे उल्लेखनीय. ‘लोकमत’ने वृत्तमालिका सुरू करताच या प्रकरणाच्या चौकशीला वेग आला.

....

आदेश वर्षभर धूळखात

२६ मे २०२० ला जिल्हा तक्रार निवारण प्राधिकारी नागपूर यांनी मनरेगा अपहारप्रकरणी गुन्हा दाखल करावा, रोजगार सेवकाकडून ५०,५२० रुपये वसूल करावे, असे आदेश दिले होते. मुंबई मंत्रालयाकडेसुद्धा या आदेशाची प्रत पोहोचली. तरीही गेंड्याची कातडी असलेल्या प्रशासकीय यंत्रणेने या गंभीर प्रकरणाची दखल घेतली नाही, असा संताप तागडे यांनी व्यक्त केला. वर्षभरापेक्षाही अधिक काळ उलटला. अधिकाऱ्यांकडे चौकशीचा कागद धूळखात पडला होता अशीही कैफियत त्याने मांडली.

....

संसदीय समितीचा दणका

उमरेड पंचायत समिती कक्षात संसदीय स्थायी समितीने (ग्राम विकास) याप्रकरणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी योगेश कुंभेजकर, खंडविकास अधिकारी जयसिंग जाधव यांना चौकशीबाबत विचारणा केली. संसदीय समितीचा दणका बसताच यंत्रणा हादरली. पोलीस ठाण्यात पोहोचली. अखेरीस शनिवारी (दि.२१) रोजी रात्री उशिराने सोनपुरी येथील मनरेगाच्या अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला.

.....

अनेकदा पंचायत समिती ते मंत्रालयापर्यंत उंबरठे झिजविले. नेहमीच उडवाउडवीची उत्तरे मिळाली. लोकमतने बाजू उचलली. प्रकरणाला वेग आला. गुन्हा दाखल करण्याचे आदेश धडकल्यानंतरही पुढील कारवाई थंडबस्त्यात होती. राजकीय दबावतंत्राचाही चांगलाच वापर झाला. अखेरीस उशिरा का होईना गुन्हा दाखल केल्या गेला.

- राहुल तागडे, सोनपुरी (ता. उमरेड)

Web Title: Filed a case of embezzlement against a MGNREGA employee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.