त्या पशुद्वेष्ट्याविरोधात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:07 AM2021-06-17T04:07:38+5:302021-06-17T04:07:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : घरी आणलेले कुत्र्याचे पिल्लू परत निघून जात नसल्याच्या रागातून एका व्यक्तीने चक्क त्याला गच्चीवरूनच ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : घरी आणलेले कुत्र्याचे पिल्लू परत निघून जात नसल्याच्या रागातून एका व्यक्तीने चक्क त्याला गच्चीवरूनच खाली फेकल्याचा प्रकार लोकमतने समोर आणला होता. पोलिसांनी ही बाब गंभीरतेने घेतली असून संबंधित पशुद्वेष्ट्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
स्नेहनगर येथील राहुल मेश्राम नामक एका व्यक्तीने मुलांना खेळण्यासाठी दोन ते तीन महिन्यांचे कुत्र्याचे पिल्लू घरी आणले होते. त्यानंतर ते पिल्लू परत जात नसल्याने राहुलने संतापाच्या भरात त्या पिल्लाला गच्चीवर बंद केले. भुकेने ते पिल्लू ओरडू लागल्यावर त्याला रागाच्या भरात थेट गच्चीवरून खाली फेकले होते. यासंदर्भात सेव्ह स्पीचलेस ऑर्गनायझेशनच्या संस्थापिका स्मिता मिरे यांनी प्रतापनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर राहुल मेश्रामविरोधात गुन्हे दाखल केले. भारतीय दंड संहितेच्या अंतर्गत ४२८ व ४२९ ही कलमे लावण्यात आली असून प्राण्यांच्या छळ प्रतिबंधक अधिनियमांतर्गतदेखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित व्यक्तीला कठोर शासन व्हावे व मानवतेला काळिमा फासणारे पाऊल उचलण्याची कुणीही हिंमत करायला नको, अशी मागणी श्वानप्रेमींकडून होत आहे.