सेव्हन स्टार हॉस्पिटल व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2020 12:22 AM2020-08-21T00:22:59+5:302020-08-21T00:24:05+5:30

कोविड काळात साथरोग प्रतिबंधात्मक कायद्यान्वये प्राप्त अधिकाराच्या अनुषंगाने मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याने नंदनवन पोलिसांनी गुरुवारी जगनाडे चौकातील सेव्हन स्टार हॉस्पिटल व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Filed a crime against the management of Seven Star Hospital | सेव्हन स्टार हॉस्पिटल व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हा दाखल

सेव्हन स्टार हॉस्पिटल व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हा दाखल

Next
ठळक मुद्देमनपा प्रशासनाने नंदनवन पोलिसात केली होती तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोविड काळात साथरोग प्रतिबंधात्मक कायद्यान्वये प्राप्त अधिकाराच्या अनुषंगाने मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याने नंदनवन पोलिसांनी गुरुवारी जगनाडे चौकातील सेव्हन स्टार हॉस्पिटल व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हा दाखल केला.
मनपा प्रशासनाने गुरुवारी केलेल्या तक्रारीच्या आधारे भादंविच्या कलम १८८, २९० सह कलम आपत्ती व्यवस्थापन कायदा अधिनियम २००५ कलम ५१, ५८, सहकलम साथीचे रोग अधिनियम १८९७ कलम ३ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला.
कोविड अथवा नॉन कोविड रुग्णांकडून शासनाने निर्धारित केलेल्या दरानुसार रुग्णांकडून रक्कम आकारावी लागते. यासंदर्भात शासनाचे स्पष्ट निर्देश आहेत. असे असताना सेव्हन स्टार रुग्णालयाने नॉन कोविड रुग्णांकडून शासनाच्या नियमांचे उल्लंघन करीत ६,८६,५२७ रुपये अधिकचे वसूलले. शासनाच्या नियमांचे पालन खासगी रुग्णालये योग्यप्रकारे करतात की नाही यासाठी मनपाचे अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा यांच्या नेतृत्वात एक पथक तयार केले आहे. हे पथक कुठल्याही रुग्णालयास आकस्मिक भेट देऊन त्याची पाहणी व तपासणी करतात. सेव्हन स्टार रुग्णालयात या पथकाला अनियमितता आढळली. शिवाय कागदपत्रांची पाहणी केली असता नॉन कोविड रुग्णांकडून अधिकची रक्कम घेतल्याचे निष्पन्न झाले. या आधारे संबंधित रुग्णालयाला तुकाराम मुंढे यांनी नोटिशीद्वारे जाब विचारला होता. मात्र, त्याचेही समाधानकारक उत्तर सेव्हन स्टार हॉस्पिटल व्यवस्थापनाकडून न मिळाल्याने आयुक्तांनी १८ ऑगस्ट रोजी एक आदेश काढला. रुग्णांकडून अतिरिक्त स्वरूपात आकारलेले ६,८६,५२७ रुपये तात्काळ परत देण्याचे आदेश याद्वारे सेव्हन स्टार हॉस्पिटलला देण्यात आले होते.
आदेशाची तात्काळ अंमलबजावणी न केल्यामुळे मनपा प्रशासनाने साथरोग प्रतिबंधक आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा आधार घेत सेव्हन स्टार हॉस्पिटलविरुद्ध नंदनवन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे नंदनवन पोलिसांनी अखेर सेव्हन स्टार हॉस्पिटल व्यवस्थापन व इतर सर्व संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Web Title: Filed a crime against the management of Seven Star Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.