सोलापूरच्या साखर कारखान्याच्या संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 03:44 PM2017-10-27T15:44:10+5:302017-10-27T15:46:54+5:30

ठरलेल्या भावात साखरेचा पुरवठा न करता फसवणूक करणाऱ्या  सोलापूरच्या भीमा सहकार साखर कारखान्याच्या व्यवस्थापकीय संचालकांसह तिघांविरुद्ध येथील एका साखर विक्रेत्याने पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे

Filed under director of sugar factory in Solapur | सोलापूरच्या साखर कारखान्याच्या संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल

सोलापूरच्या साखर कारखान्याच्या संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल

googlenewsNext
ठळक मुद्देसाखरेचा व्यवहार झाला कटू एक कोटीच्या फसवणूकीचा आरोप

आॅनलाईन लोकमत
नागपूर : ठरलेल्या भावात साखरेचा पुरवठा न करता फसवणूक करणाऱ्या  सोलापूरच्या भीमा सहकार साखर कारखान्याच्या व्यवस्थापकीय संचालकांसह तिघांविरुद्ध येथील एका साखर विक्रेत्याने पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे. रमेशकुमार गिरधारीलाल जैजानी (वय ६७) असे तक्रारकर्त्या व्यापाऱ्याचे नाव असून, आरोपींनी त्यांच्याकडून एक कोटी रुपये हडपल्याचा आरोप आहे.
जैजानी यांनी नंदनवन ठाण्यात नोंदविलेल्या तक्रारीनुसार, २० नोव्हेंबर २०१५ रोजी त्यांना भीमा सहकारी साखर कारखाना, सोलापूर (ग्रामीण)च्या पदाधिकाऱ्यांनी  संपर्क केला. तुम्हाला आम्ही २४५० रुपये प्रति क्विंटल भावाने १० हजार क्विंटल साखर पुरवू शकतो, अशी यावेळी साखर कारखान्याच्या संचालकांनी आॅफर दिली. त्यानंतर कारखान्याचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक ई. जी. सदानंद आणि पार्श्वनाथ एन्टरप्रायजेसचे मालक विनय सनके (रा. शाहू वाडी, कोल्हापूर) यांच्यासोबत सौद्याबाबत प्रदीर्घ बोलणी झाली. करार पक्का झाल्यानंतर जैजानी यांना त्यांनी साखर कारखान्याच्या खात्यात २ कोटी, ४५ लाख रुपये जमा करायला लावले. नंतर मात्र ठरल्याप्रमाणे आरोपींनी जेजानी यांना साखरेचा पुरवठा केला नाही. ठरल्यापेक्षा जास्त भावाने साखर खरेदी करायला सांगितली जात असल्यामुळे जैजानी यांनी नकार दिला. त्यानंतर आरोपींनी त्यांना एक कोटी, ४५ लाख रुपये परत केले. मात्र, उर्वरित एक कोटी रुपये अद्याप परत केले नाही. त्यामुळे त्यांनी पोलिसांकडे फसवणूकीची तक्रार नोंदवली. नंदनवन पोलिसांनी चौकशी केल्यानंतर गुरुवारी या प्रकरणी गुन्हा दाखल केला. पुढील तपास सरू आहे.

Web Title: Filed under director of sugar factory in Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा