जमीन हडपणाऱ्या भूमाफियांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 01:28 AM2018-06-17T01:28:31+5:302018-06-17T01:28:40+5:30
निराधार महिलेच्या असहायतेचा गैरफायदा उचलून तिची सुमारे १२ ते १५ हजार चौरस फूट जमीन हडपणाऱ्या चौकडीविरुद्ध एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. वासुदेव दिगांबर बेदरकर (वय ६१), प्रदीप वासुदेव बेदरकर (तेव्हाचा पत्ता, रा. वानाडोंगरी), सेवकराम दिनबाजी शहानकर आणि सतीश भाऊरावजी शहानकर (रा. वानाडोंगरी) अशी आरोपींची नावे आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : निराधार महिलेच्या असहायतेचा गैरफायदा उचलून तिची सुमारे १२ ते १५ हजार चौरस फूट जमीन हडपणाऱ्या चौकडीविरुद्ध एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. वासुदेव दिगांबर बेदरकर (वय ६१), प्रदीप वासुदेव बेदरकर (तेव्हाचा पत्ता, रा. वानाडोंगरी), सेवकराम दिनबाजी शहानकर आणि सतीश भाऊरावजी शहानकर (रा. वानाडोंगरी) अशी आरोपींची नावे आहेत.
तक्रारकर्त्या महिलेचे नाव सिंधूताई रामकृष्ण नस्से (वय ४०) असून, त्या वानाडोंगरीतील जुन्या वस्तीत राहतात. एमआयडीसीतील हिंगणा मार्गावर मौजा वानाडोगरीत (खसरा नंबर ३५०) सिंधूतार्इंच्या वडिलांची जमीन आहे. ०.५४ आर जमिनीपैकी ०.४० आर (एक एकर) जमीन सिंधूतार्इंचे वडील नत्थूजी लडी यांनी ७ जून १९८४ ला दस्तनंबर ३७३०/ १९८४ प्रमाणे आरोपी वासुदेव दिगांबर बेदरकर (वय ६१), प्रदीप वासुदेव बेदरकर (तेव्हाचा पत्ता, रा. वानाडोंगरी) यांना विकली होती. त्यातील ०.१४ आर जमीन तशीच होती. या जमिनीकडे मूळ मालक आणि त्यांच्या वारसाचे दुर्लक्ष झाल्याचे पाहून आरोपी बेदरकर बापलेकाने सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित नागपूर या संस्थेला ही जमीन विकली. त्यावेळी त्यांनी केलेल्या विक्रीपत्रात ०.४० ऐवजी ०.५४ आर जमिनीचे विक्रीपत्र आरोपींनी करून दिले. सहकार गृहनिर्माण सहकारी संस्था मर्यीदित नागपूरचे अध्यक्ष सेवकराव शहानकर आणि सचिव सतीश शहानकर या दोघांनी बेदरकर बापलेकाच्या कटकारस्थानात सहभागी होऊन निराधार सिंधूतार्इंच्या वडिलांची ०.१४ आर (सुमारे १२ ते १५ हजार चौरस फूट) जमीन बनावट कागदपत्रांच्या आधारे आपल्या ताब्यात घेतली. त्यावर लेआऊट टाकून भूखंडही विकून टाकले. १६ जानेवारी १९९२ पासून आरोपी बेदरकर पिता-पुत्र, सेवकराम शहानकर आणि सतीश शहानकर यांनी ही बनवाबनवी केली. ती ध्यानात आल्यानंतर सिंधूतार्इंनी वारंवार त्यांच्याकडे आपली जमीन परत मिळावी म्हणून आर्जव-विनंत्या केल्या, मात्र त्यांना आरोपींनी दाद दिली नाही. त्यामुळे त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. एमआयडीसी पोलिसांनी चौकशीअंती भादंविच्या कलम ४२०, ११४ अन्वये गुन्हा दाखल केला.
भूमाफियांना खुले रान
या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला, मात्र आरोपींना अटक झाली की नाही, ते पोलिसांकडून स्पष्ट होऊ शकले नाही. लाखो रुपयांच्या जमिनींच्या प्रकरणात बरेचदा पोलीस गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करतात. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींना तातडीने अटक केली जात नाही. अनेक प्रकरणांत पोलीस माहितीही उशिरा देतात. पोलिसांची अशी साथ मिळाल्यामुळे आरोपी अटकपूर्व जामीन मिळवतात. काही दिवसांपूर्वी गाजलेल्या हिंगण्यातील सतीश मुंडे प्रकरणासह अनेक प्रकरणांत ठिकठिकाणच्या पोलिसांनी अशी संशयित भूमिका वठवली आहे. आरोपींना अटक झाली की नाही, अशी विचारणा केली असता चौकशी सुरू आहे, असे उत्तर देऊन पोलीस मोकळे होतात. पोलिसांकडूनच रान मोकळे झाल्यामुळे भूमाफिया अनेक गरीब आणि पीडितांची जमीन राजरोसपणे हडपत आहेत.