निवृत्त सहायक पोलीस आयुक्तांविरुद्ध गुन्हा दाखल
By admin | Published: October 17, 2015 03:34 AM2015-10-17T03:34:29+5:302015-10-17T03:34:29+5:30
निवृत्त सहायक पोलीस आयुक्त (एसीपी) शिवप्रसाद संतुरामजी कुदरे (वय ६०, रा. नरेंद्रनगर) यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुन्हा दाखल केला आहे.
मुंबईत मालमत्ता : अपसंपदेचा आरोप, एसीबीची कारवाई
नागपूर : निवृत्त सहायक पोलीस आयुक्त (एसीपी) शिवप्रसाद संतुरामजी कुदरे (वय ६०, रा. नरेंद्रनगर) यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुन्हा दाखल केला आहे. नोकरीत असताना पदाचा गैरवापर करून लाखोंची अपसंपदा जमविल्याच्या आरोपावरून एसीबीने ही कारवाई केली असून, पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
कुदरे शहर पोलीस दलात विविध पदावर कार्यरत होते. गुन्हेशाखेच्या आर्थिक सेलमध्ये कार्यरत असताना कळमना सोसायटीच्या घोटाळ्याचा अर्थात प्रमोद अग्रवाल याच्या फसवणूक प्रकरणाचा तपास कुदरे यांच्याकडेच होता. यानंतर कुदरे यांचे प्रमोशन होऊन ते एसीपी झाले. २०१३ मध्ये ते निवृत्त झाले. त्यांनी आपल्या नोकरीच्या काळात पदाचा दुरुपयोग करून प्रचंड अपसंपदा जमविल्याचा आरोप होता. त्याबाबत एसीबीकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी झाल्या होत्या. त्यामुळे एसीबीचे अधीक्षक राजीव जैन यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक मिलिंद तोतरे तसेच धर्मेद्र काळे, कोमल बिसेन, मनोज कारणकर, राजेंद्र जाधव आणि मनोहर डोईफोडे यांनी कुदरेची उघड चौकशी सुरू केली. कुदरे यांचे वसई मुंबईत दोन फ्लॅट, नागपुरात एक, एक झायलो गाडी आणि अन्य मालमत्ता एसीबीच्या चौकशीत उजेडात आली. कुदरे २२ जानेवारी १९७६ ला पोलीस दलात रुजू झाले.
तेव्हापासून तो निवृत्तीच्या ३१ मार्च २०१३ पर्यंत त्यांनी ज्ञात स्रोताव्यतिरिक्त जास्त मालमत्ता जमविल्याचे स्पष्ट झाल्यामुळे या मालमत्तेबाबत कुदरे यांच्याकडे एसीबीच्या अधिकाऱ्यांनी विचारणा केली. ते याबाबत समाधानकारक माहिती देऊ शकले नाहीत. (प्रतिनिधी)
गुन्हा दाखल
कुदरे यांनी १० लाख, १० हजार, ९५१ रुपयांची अपसंपदा जमविल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले. त्यामुळे एसीबीने शुक्रवारी कुदरे यांच्याविरोधात अजनी पोलीस ठाण्यात अपसंपदेचा गुन्हा दाखल केला.