विदेश शिक्षणासाठी विधी शाखेचा संपूर्ण काेटा भरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:13 AM2021-08-27T04:13:24+5:302021-08-27T04:13:24+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कुही : राजर्षी छत्रपती शाहू महाराज विदेश शिष्यवृत्ती योजनेत २०२१ पासून वाढीव ५० जागांच्या निर्णयाची तात्काळ ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
कुही : राजर्षी छत्रपती शाहू महाराज विदेश शिष्यवृत्ती योजनेत २०२१ पासून वाढीव ५० जागांच्या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी. तसेच विधी शाखेच्या विदेशी पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी असलेल्या राखीव आठही जागा भरण्यात याव्यात, अशी मागणी तालुक्यातील पदवीधरांनी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्याकडे केली आहे.
विदेश शैक्षणिक शिष्यवृत्तीकरिता राज्यातील ७५ विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणासाठी निवड केली जाते. यामध्ये यावर्षी शासनाने वाढ करून ५० जागा वाढीचा निर्णय घेतला आहे. २०२१-२२ करिता ७५ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. ५० वाढीव जागांची निवड होणे शिल्लक आहे. निवड सूचीमध्ये प्रामुख्याने अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्यामुळे विधी व इतर अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष झाले आहे.
अभियांत्रिकीच्या २८ जागा व विधी शाखेच्या आठ जागा मंजूर असताना, विधी शाखेच्या केवळ दाेन जागा भरलेल्या आहेत. त्यामुळे शासन निर्णयानुसार वाढीव ५० जागांमध्ये विधी शाखेच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी पुरेशा जागा भरण्यात याव्यात, जेणेकरून ज्या विधी शाखेच्या जागा दुसऱ्या अभ्यासक्रमाकडे वर्ग करण्यात आलेल्या आहेत, त्या जागा भरण्यात येतील व सर्व विभागांच्या जागांचा समतोल राखून सर्वांना समान न्याय मिळेल. वाढीव ५० जागांच्या निर्णयामुळे विधी शाखेसह अन्य शाखेतील विद्यार्थ्यांना विदेशात शिक्षण घेता येईल. विधी शाखेचे विद्यार्थी विदेश शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून यासाठी तात्काळ प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी राजानंद कावळे यांच्यासह पदवीधरांनी केली आहे.