नगरपालिकेतील स्थायी रिक्त पदे भरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:07 AM2021-06-29T04:07:44+5:302021-06-29T04:07:44+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कन्हान : नगर परिषदेत काही महत्त्वाची स्थायी पदे रिक्त आहेत. त्यामुळे एकीकडे शहराच्या विकास कामांवर परिणाम ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
कन्हान : नगर परिषदेत काही महत्त्वाची स्थायी पदे रिक्त आहेत. त्यामुळे एकीकडे शहराच्या विकास कामांवर परिणाम झाला असून, दुसरीकडे, नागरिकांची कामे रखडली जात आहेत. त्यामुळे राज्य शासनाने ही पदे तातडीने भरावी, अशी मागणी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख वर्धराज पिल्ले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या निवेदनात केली असून, उपाेषणाचा इशारा दिला आहे.
सन २०१४ मध्ये कन्हान ग्रामपंचायतचे नगर परिषदेत रूपांतर करण्यात आले. राज्य शासनाने कन्हान नगर परिषदेचा ‘क’ श्रेणीत समावेश केला आहे. मात्र, या श्रेणीतील संवर्गीय व रिक्त पदांवर कर्मचाऱ्यांची सुरुवातीपासून यावर नियुक्ती केली नाही. कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे शहरातील नागरिकांची कामे प्रलंबित राहात असल्याने त्यांना मनस्ताप सहन करावा लागताे. शिवाय, प्रशासकीय कामात अडचणी निर्माण हाेत असल्याने शासनाला माहिती देण्यास पालिका प्रशासनाकडून विलंब हाेताे. याचा शहरातील विविध विकास कामांवर परिणाम हाेताे.
कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे. पालिका प्रशासनाची दैनंदिन व प्रशासकीय कामे सुरळीत करण्यासाठी, नागरिकांच्या समस्या वेळीच मार्गी लागण्यासाठी ही रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी वर्धराज पिल्ले यांनी केली असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावे असलेले निवेदन नगराध्यक्ष करुणा आष्टनकर यांनी स्वीकारले.