कस्तूरचंद पार्क भरले, नेत्यांचे चेहरे फुलले

By admin | Published: April 12, 2016 05:12 AM2016-04-12T05:12:31+5:302016-04-12T05:12:31+5:30

अ.भा. काँग्रेस समितीतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्ष सांगता सोहळा सोमवारी

Filled with Kasturchand Park, the faces of the leaders blossomed | कस्तूरचंद पार्क भरले, नेत्यांचे चेहरे फुलले

कस्तूरचंद पार्क भरले, नेत्यांचे चेहरे फुलले

Next

नागपूर : अ.भा. काँग्रेस समितीतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्ष सांगता सोहळा सोमवारी कस्तूरचंद पार्क येथे आयोजित करण्यात आला. अ.भा. काँग्रेस समितीच्या अध्यक्ष सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहुल गांधी यांची सभादेखील झाली. या सभेला गर्दी होईल की नाही, याची शंका काँग्रेस नेत्यांच्या मनात होती. दुपारी ४ पर्यंत अर्धे मैदान रिकामे होते. सायंकाळी ५ वाजताही बरीच मोकळी जागा दिसत होती. मात्र, ५ वाजता उन्हाचा कडाका काहीसा कमी झाला अन् नागरिकांचे लोंढे मैदानावर येऊ लागले. पाहता पाहता तासाभरात कस्तूरचंद पार्क खचाखच भरले. हे चित्र पाहून मंचावर उपस्थित काँग्रेस नेत्यांचे चेहरे फुलले.
सभेसाठी काँग्रेसने जोरात नियोजन केले होते. प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण गेले दोन दिवस नागपुरात तळ ठोकून होते. नागपूर शहर अध्यक्ष विकास ठाकरे, जिल्हाध्यक्ष सुनीता गावंडे यांच्या नेतृत्वात शहर व जिल्हा काँग्रेस कामाला लागली होती. माजी मंत्री,
पदाधिकाऱ्यांनी विधानसभानिहाय बैठका घेऊन नियोजन केले होते. त्यामुळे गर्दी होईल, अशी काँग्रेस नेत्यांना अपेक्षा होती. मात्र शुक्रवार, शनिवार व रविवार असे तीन दिवस सलग सुट्या आल्या. सोमवारी आठवड्याचा पहिला ‘वर्किंग डे’ होता.
उन्हाचा कडाकाही दिवसेंदिवस वाढत होता; शिवाय सभेची वेळ सायंकाळी ५ वाजताची जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे गर्दीबाबत काहीशी चिंताही होती. दुपारी २ च्या सुमारास नागपूरचे तापमान ४२.२ अंशांवर पोहचले. उन्हाचा तीव्र कडाका जाणवू लागला. आता उन्हात लोक येणार की नाही, अशी चिंता पुन्हा नेत्यांना वाटू लागली. सायंकाळी ५ पर्यंत कस्तूरचंद पार्कवर जमलेली नाममात्र गर्दी पाहून काँग्रेस नेत्यांचे चेहरे पडले होते; मात्र नंतरच्या तासाभरात चित्र बदलले. कस्तूरचंद पार्ककडे जाणाऱ्या रस्त्यांवर लोकांचे जत्थे दिसू लागले व सभा सुरू होण्यापूर्वी मैदान भरले.
नेत्यांनी केले स्वागत
कस्तूरचंद पार्क येथे काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी सोनिया व राहुल गांधी यांचे स्वागत केले. यात माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, माजी मंत्री अनिस अहमद, काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे, जिल्हाध्यक्ष सुनीता गावंडे, आ. यशोमती ठाकूर, प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्ष चारुलता टोकस, अनंतराव घारड, डॉ. बबन तायवाडे, भंडारा जिल्हा काँग्रेस अध्यक्ष जिया पटेल, विशाल मुत्तेमवार, शहर काँग्रेस सरचिटणीस अतुल कोटेचा, अभिजित वंजारी, उमाकांत अग्निहोत्री, बंटी शेळके, मुजीब पठाण, कुंदा राऊत, प्रज्ञा बडवाईक, मुन्ना ओझा, नितीन कुंभलकर, गिरीश पांडव, हुकूमचंद आमधरे, शेख हुसैन आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)

नगरसेवक प्रशांत धवड यांनी स्वत:च्या खिशाला लागलेला तिरंगा काढून राहुल गांधी यांच्या खिशाला लावून दिला. (प्रतिनिधी)

लांबच्या पार्किंगचा त्रास
४पार्किंगची व्यवस्था कस्तूरचंद पार्कपासून चार ते पाच किलोमीटर अंतरावर करण्यात आली होती. त्यामुळे बहुतांश गाड्या दूरवरच थांबविण्यात आल्या. कडक उन्हात लोकांना पायी चालत यावे लागले. बऱ्याच लोकांनी मध्येच सावलीचा आडोसा घेतला व ऊन कमी झाल्यानंतर कस्तूरचंद पार्क गाठले. पोलिसांनी सभास्थळापर्यंत गाड्या येऊ न दिल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. काही ठिकाणी कार्यकर्त्यांची पोलिसांशी बाचाबाचीही झाली.

Web Title: Filled with Kasturchand Park, the faces of the leaders blossomed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.