ठगबाज नानवानीविरुद्ध गुन्हा दाखल
By Admin | Published: March 7, 2016 02:37 AM2016-03-07T02:37:29+5:302016-03-07T02:37:29+5:30
आधीच विकलेल्या दुकानांचा पुन्हा सौदा करून त्यापोटी ४० लाख रुपये हडपणाऱ्या ठगबाज नानक हरिचंद्र नानवानी ...
४० लाख हडपले : पत्नीही आरोपी
नागपूर : आधीच विकलेल्या दुकानांचा पुन्हा सौदा करून त्यापोटी ४० लाख रुपये हडपणाऱ्या ठगबाज नानक हरिचंद्र नानवानी (वय ५२) आणि त्याची पत्नी दिशा नानक नानवानी (वय ४९,रा. अनमोल अपार्टमेंट, जरीपटका) या दोघांविरुद्ध जरीपटका पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
चावला चौक जरीपटका येथील रहिवासी कन्हैयालाल लेखमल दासवानी आणि नानक नानवानी या दोघांमध्ये व्यावसायिक मैत्री होती. जून २०१५ मध्ये नानवानीने दासवानीला गाठले. कर्जामुळे पैशांची खूप आवश्यकता आहे. त्यामुळे आपण कमाल चौकातील आपल्या साईनाथ शॉपिंग कॉम्प्लेक्समधील यूजी २ आणि यूजी ३ ही दोन दुकाने विकायची आहेत, असे सांगितले. मोक्याच्या जागेवर असलेली ही दोन दुकाने फर्निचरसह एक कोटी रुपयात विकत घेण्याचा सौदा दासवानी याने केला. त्याबदल्यात पाच लाखांचे सहा चेक नानकच्या नावे आणि पाच लाखांचे दोन चेक दिशा नानक नानवानी यांच्या नावाने दिले.
१० जून २०१५ ते ५ मार्च २०१६ या कालावधीत हा व्यवहार झाला. आरोपींनी हे ४० लाख रुपये हडपल्यानंतर दुकानांची विक्री करून देण्यासाठी टाळाटाळ चालवली.
संशय आल्यामुळे कन्हैयालाल दासवानीने चौकशी केली असता, या दुकानांवर नानवानीने १ कोटी ३८ लाख रुपये उचलल्याचे लक्षात आले. याशिवाय अनेकांना त्याने ही दुकाने विकण्याचा सौदा केल्याचेही उघड झाले.
दुकानांची आपण विक्री करून मालकी घेऊ शकत नाही, हे लक्षात आल्यामुळे दासवानीने नानवानीला आपले ४० लाख रुपये परत मागितले. तेव्हा पैसे देण्यास नकार देऊन आरोपीने शिवीगाळ केली, तसेच खोट्या आरोपात फसवण्याचीही धमकी दिली. त्यामुळे दासवानीने जरीपटका ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर आज नानवानी दाम्पत्यावर गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी)
हा ‘तोच’ ठगबाज
काही दिवसांपूर्वी एका व्यापाऱ्याने फुटाळा तलावात आत्महत्या करण्याचे नाटक केले होते. उडी घेताच बाहेर काढा, असे त्याने फुटाळयावरील पोहणाऱ्यांना सांगितले होते. हे नाटक केल्यानंतर त्याने पोलीस ठाण्यात आपल्या वकिलांना बोलवून काही व्यापारी त्रास देत असल्यामुळे आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले होते. पोलिसांसमोर देणेकरी व्यापाऱ्यांची नावे सांगितल्यास ते मनधरणी करतील, असा त्याचा कट होता. तसेच झाले. पोलिसांकडे तक्रार होऊ नये म्हणून काही व्यापाऱ्यांनी आपली रक्कम परत मागणे थांबवले. व्यापाऱ्यांची अशा पद्धतीने फसवणूक करणारा ‘तो’ हाच ठगबाज होय.