हिवाळी अधिवेशनाबाबत अंतिम निर्णय होणार मुंबईत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2021 09:36 PM2021-10-29T21:36:03+5:302021-10-29T21:37:18+5:30
Nagpur News अजूनही हिवाळी अधिवेशन नागपुरात होईल की नाही, हे स्पष्ट झालेले नाही. कारण हिवाळी अधिवेशनाबाबतचा अंतिम निर्णय मुंबईतच होईल, असे राज्याचे सार्वजनिक बांधकाम व सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी येथे स्पष्ट केले.
नागपूर : कोरोना सावटामध्ये नागपूर येथे ७ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन प्रस्तावित आहे. त्याची तयारी सुरू आहे. वरिष्ठ स्तरावर तयारीचा आढावाही घेतला जात आहे; परंतु अजूनही हिवाळी अधिवेशन नागपुरात होईल की नाही, हे स्पष्ट झालेले नाही. कारण हिवाळी अधिवेशनाबाबतचा अंतिम निर्णय मुंबईतच होईल, असे राज्याचे सार्वजनिक बांधकाम व सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी येथे स्पष्ट केले. शुक्रवारी त्यांनी नागपुरात येऊन अधिवेशनाच्या तयारीचा आढावा घेतला.
यापूर्वी विधिमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांच्या अध्यक्षतेखाली १८ ऑक्टोबरला बैठक झाली होती. त्यामध्ये कोविडच्या पार्श्वभूमीवर या अधिवेशनासाठी विशेष प्रतिबंधात्मक तयारी करण्याबाबत सूचना करण्यात आली होती. त्यानंतर शुक्रवारी राज्यमंत्र्यांनी आढावा घेतला. स्थानिक प्रशासनाने पूर्वतयारीसाठी घेतलेल्या आघाडीबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
अधिवेशनासंदर्भात अधिकृत घोषणा मुंबई येथे होणार आहे. मात्र, सध्या सुरू असलेल्या कामकाजाची वस्तुस्थिती त्यांनी जाणून घेतली. विधानभवन, विधानभवनाबाहेरील परिसर, आमदार निवास, रविभवन, १६० खोल्यांचे गाळे, सुयोग पत्रकार निवास या ठिकाणच्या सुरक्षा व्यवस्था, पार्किंग व्यवस्था, दूरध्वनी व्यवस्था, वाहन व्यवस्था, अखंडित वीजपुरवठा, अहोरात्र वैद्यकीय सुविधा, नैसर्गिक आपत्तीमध्ये आपत्कालीन व्यवस्था, अग्निशमन दलाची उपलब्धता, विनाअडथळा इंटरनेट, वाय-फाय सुविधा, रेल्वे आरक्षण, खानपान व्यवस्था, अन्नपदार्थ व पेय यांची तपासणी, उत्तम स्वच्छता यासंदर्भात त्यांनी आढावा घेतला. सर्व प्राथमिक तयारी सुरू ठेवण्याबाबत त्यांनी सूचना केली.