नागपुरात मेट्रो स्टेशनचे बांधकाम अंतिम टप्प्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 09:08 PM2019-02-21T21:08:07+5:302019-02-21T21:09:09+5:30
नागपूरकर मेट्रो रेल्वेतून प्रवास करण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत, तर दुसरीकडे महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन (महामेट्रो) नागपुरात मेट्रो सेवा सुरू करण्यासाठी दिवस-रात्र काम करीत आहे. एअरपोर्ट मेट्रो स्टेशन ते सीताबर्डी मुंजे चौकातील इंटरचेंज स्टेशनपर्यंत मेट्रो पुलाचे (व्हाया डक्ट) काम पूर्ण झाले आहे. यावरून चीन येथून खरेदी केलेल्या रेल्वेचे आरडीएसओतर्फे ऑसिलेशन ट्रायल रन घेण्यात आली. शिवाय मेट्रो स्टेशनचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी लोकमतशी बोलताना दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूरकर मेट्रो रेल्वेतून प्रवास करण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत, तर दुसरीकडे महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन (महामेट्रो) नागपुरात मेट्रो सेवा सुरू करण्यासाठी दिवस-रात्र काम करीत आहे. एअरपोर्ट मेट्रो स्टेशन ते सीताबर्डी मुंजे चौकातील इंटरचेंज स्टेशनपर्यंत मेट्रो पुलाचे (व्हाया डक्ट) काम पूर्ण झाले आहे. यावरून चीन येथून खरेदी केलेल्या रेल्वेचे आरडीएसओतर्फे ऑसिलेशन ट्रायल रन घेण्यात आली. शिवाय मेट्रो स्टेशनचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी लोकमतशी बोलताना दिली.
व्यावसायिक रन सुरू झाल्यानंतर मेट्रो रेल्वे प्रारंभी खापरी, न्यू एअरपोर्ट, साऊथ एअरपोर्ट (अॅटग्रेड सेक्शन), एअरपोर्ट मेट्रो स्टेशन, जयप्रकाशनगर आणि सीताबर्डी मुंजे चौकातील इंटरचेंज मेट्रो स्टेशनपर्यंत धावणार आहे. या स्टेशनपैकी खापरी, न्यू एअरपोर्ट आणि साऊथ एअरपोर्ट मेट्रो स्टेशनचे बांधकाम पूर्ण झाले आहे. या स्टेशनवर एक वर्षापासून नागपूरकरांसाठी मेट्रोच्या जॉय राईडचे आयोजन करण्यात आले.
वर्धा रोडवर प्राईड हॉटेलसमोर एअरपोर्ट मेट्रो स्टेशन, रॅडिसन ब्ल्यू हॉटेल चौकातील जयप्रकाशनगर मेट्रो स्टेशन आणि मुंजे चौक, सीताबर्डी येथील स्टेशनचे काम वेगात सुरू आहे. यापैकी एअरपोर्ट आणि सीताबर्डी इंटरचेंज स्टेशनचे काम अंतिम टप्प्यात आहे. या तिन्ही स्टेशनचे बांधकाम २८ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण होईल, असा अधिकाऱ्यांचा दावा आहे. या स्टेशनचे बांधकाम ऑक्टोबर २०२६ मध्ये सुरू झाले. आयएल अॅण्ड एफएस कंपनी बंद झाल्यानंतर काम काही दिवस थांबले होते. पण महामेट्रो अन्य कंत्राटदार कंपन्यांच्या माध्यमातून काम वेगात करीत आहे.
मेट्रो स्टेशनवर असणार आधुनिक सुविधा
व्यावसायिक रन सुरू होणाऱ्या एअरपोर्ट, जयप्रकाशनगर आणि इंटरचेंज मेट्रो स्टेशनवर प्रवाशांना आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सौर ऊर्जेवर चालणारे एस्केलेटर, लिफ्ट, कॉनकोर्स एरिया, शॉप, नेत्रहीन व दिव्यांगांना विशेष सुविधा, रॅम्प, महिलांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षक, वाहनांसाठी पार्किंग सुविधा राहणार आहे. या सुविधेसाठी आवश्यक बांधकाम सुरू आहे.
ऑरेंज, फॉरेस्ट आणि मॉडर्न थीम
एअरपोर्ट स्टेशनला ऑरेंज थीमवर साकार करण्यात येत आहे. स्टेशनच्या दोन्ही बाजूची भिंत (पॅनल) ऑरेंज रंगाची आहे. जयप्रकाशनगर स्टेशनसाठी फॉरेस्ट थीम आणि इंटरचेंज स्टेशन मॉडर्न थीमवर साकार करण्यात येत आहे.
स्टेशनचे बांधकाम आव्हानात्मक
महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, मेट्रो पुलावर (वायाडक्ट) मेट्रो स्टेशनचे बांधकाम हे आव्हानात्मक कार्य आहे. वर्धा रोडवरील मेट्रो पुलावर डबलडेकर पूल असल्यामुळे स्टेशनची उंची अन्य मेट्रो मार्गावरील स्टेशनच्या तुलनेत जास्त आहे. ही उंची २४ मीटरपर्यंत तर अन्य स्टेशनची उंची ९ ते १० मीटर आहे. त्यामुळे डबलडेकर पूल असलेल्या मेट्रो पुलावर स्टेशनचे बांधकाम करणे अत्यंत कठीण आहे.
स्टेशनवर डिस्प्ले बोर्ड
प्रवाशांना रेल्वेच्या फेऱ्यांची माहिती देण्यासाठी स्टेशनवर उद्घोषणा प्रणालीसह अत्याधुनिक उपकरणे लावण्यात आली असून प्रात्यक्षिक झाले आहे. डिस्प्ले बोर्डवर झळकणारी माहिती ३५ मीटर अंतरावर स्पष्ट दिसणार आहे. प्रत्येक प्लॉटफॉर्मवर ५२ इंच आकाराचे डिस्प्ले बोर्ड लावण्यात आले आहेत. स्टेशनचे प्रवेशद्वार आणि परिसरात बोर्ड लावण्यात येत आहेत. प्रत्येक स्टेशनवर ८ ते १० बोर्ड राहतील. रेल्वे किती वाजता कोणत्या प्लॉटफॉर्मवर पोहोचेल, शिवाय अन्य रेल्वे त्याच मार्गावर किती वाजता येईल, याची माहिती देण्यात येणार आहे. एका बोर्डवर तीन ते चार रेल्वेचे वेळापत्रक राहील. या बोर्डाची जबाबदारी कंट्रोलरकडे देण्यात येईल. डिस्प्ले बोर्डवर मराठी, हिंदी अणि इंग्रजी भाषेत माहिती देण्यात येणार आहे. उद्घोषणा प्रणालीचे आतापर्यंत ४०० ट्रायल झाले आहेत.
पंतप्रधानांच्या हस्ते ३ मार्चला उद्घाटन?
नागपूर मेट्रो रेल्वेचा व्यावसायिक रन सुरू करण्यासाठी महामेट्रो फेब्रुवारीपर्यंत काम पूर्ण करण्याच्या तयारीत आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते आणि व्यावसायिक रनचे उद्घाटनही त्यांच्याच हस्ते व्हावे, अशी महामेट्रोची इच्छा आहे. या संदर्भात एक महिन्यापूर्वीच पंतप्रधान कार्यालयाशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. कार्यालयाने ३ मार्चवर शिक्कामोर्तब केले असून दोन दिवसात विस्तृत माहिती महामेट्रो कार्यालयाकडे येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.