अंतिम सत्राचे निकाल जाहीर; पदव्युत्तर प्रवेशप्रक्रिया केव्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:11 AM2021-08-24T04:11:24+5:302021-08-24T04:11:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदवीच्या अंतिम सत्राच्या परीक्षांचे निकाल लागायला सुरुवात झाली आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदवीच्या अंतिम सत्राच्या परीक्षांचे निकाल लागायला सुरुवात झाली आहे. असे असले तरी अद्यापही नागपूर विद्यापीठाने पदव्युत्तर प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केलेले नाही. विद्यार्थ्यांकडून यासंदर्भात सातत्याने विचारणा होत आहे.
कोरोनामुळे नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना उशिरा सुरुवात झाली. बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी., बीसीसीए यासह बऱ्याच अभ्यासक्रमांच्या अंतिम सत्राचे निकाल जाहीर झाले आहेत, तर अनेक अभ्यासक्रमांचे निकाल कधीही जाहीर होऊ शकतात अशी स्थिती आहे. नागपूर विद्यापीठाने पदवी प्रवेशासाठी नोंदणी सुरू केली व आता त्याची जबाबदारी महाविद्यालयांकडेदेखील दिली आहे. मात्र पदव्युत्तर प्रवेशासाठी अद्यापही पुढाकार घेतलेला नाही. मागील काही वर्षांपासून पदव्युत्तर प्रवेश केंद्रिभूत ऑनलाइन पद्धतीने होत आहेत. यावेळीदेखील तीच प्रक्रिया राहील की त्यात आणखी काही बदल होईल, असा सवाल विद्यार्थ्यांना सतावत आहे. यासंदर्भात अनेक विद्यार्थ्यांना विद्यापीठाशीदेखील संपर्क साधला. मात्र नेमके चित्र स्पष्ट नसल्याने विद्यापीठातील अधिकाऱ्यांनादेखील नेमके उत्तर माहीत नसल्याचे चित्र आहे.
यासंदर्भात कुलसचिव डॉ.राजू हिवसे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी लवकरच प्रवेशप्रक्रिया सुरू होईल, असे स्पष्ट केले. प्रवेशप्रक्रियेची नियमावली ठरविण्यासाठी समिती गठित केली असून, त्यांचे काम अंतिम टप्प्यात आहे. समितीच्या शिफारशींनुसार प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.