वेगळ्या विदर्भाचे वारकरी मधुकरराव किंमतकर अनंतात विलीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 10:08 AM2018-01-05T10:08:34+5:302018-01-05T10:09:45+5:30
विदर्भ अनुशेषाचे गाढे अभ्यासक, माजी राज्यमंत्री अॅड. मधुकरराव किंमतकर यांच्या पार्थिवावर रामटेकच्या अंबाळा घाटावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : विदर्भ अनुशेषाचे गाढे अभ्यासक, माजी राज्यमंत्री अॅड. मधुकरराव किंमतकर यांच्या पार्थिवावर रामटेकच्या अंबाळा घाटावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिसांनी फैरी झाडून सलामी दिली. पुत्र प्रसाद किंमतकर यांनी चितेला भडाग्नी दिला. विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या मधुकरराव यांच्या चाहत्यांनी त्यांना अखेरचा दंडवत केला.
तत्पूर्वी समर्थ विद्यालयाच्या प्रांगणात अंतिम दर्शनासाठी पार्थिव ठेवण्यात आले. रामटेक शहरासह पंचक्रोशीतून आलेल्या त्यांच्या चाहत्यांनी तेथेच अंत्यदर्शन घेतले. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी राज्यमंत्री तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, आ. डी. एम. रेड्डी, माजी आ. आशिष जयस्वाल, नगराध्यक्ष दिलीप देशमुख, पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे, गोंगपाचे राष्टय अध्यक्ष वासुदेवशहा टेकाम, डॉ. राजीव पोतदार, सदानंद निमकर, टेकचंद सावरकर, तापेश्वर वैद्य आदी उपस्थित होते. त्यानंतर समर्थ विद्यालयाच्या प्रांगणातून फुलांनी सजविलेल्या ट्रकवर पार्थिव ठेवून अंत्ययात्रेला प्रारंभ झाला. किसान चौकातील काँग्रेस कमेटीचे कार्यालय, राष्ट्रीय आदर्श विद्यालय, गांधी चौक, नरेंद्र तिडके महाविद्यालय आदी ठिकाणी मान्यवरांसह नागरिकांनी अंत्यदर्शन घेतले. अंबाळा घाटावर पोलीस अधीक्षश शैलेश बलकवडे यांच्या नेतृत्वात पोलीस दलाने ११ बंदुकीतून फैऱ्या झाडत सलामी दिली. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेत अंबाळा घाटावर शोकसभा घेण्यात आली. यावेळी आशिष जयस्वाल, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अविनाश सुर्वे, राजेंद्र मुळक, सलील देशमुख, नितीन रोंघे, माजी खा. सुरेश वाघमारे, आ. रेड्डी, बी. टी. देशमुख यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या. यावेळी मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.