नागपूर मनपा : अंतिम प्रभाग रचना जाहीर; कुमेरियांचा आक्षेप मान्य, एकासाठी तीन प्रभागात बदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2022 11:48 AM2022-05-18T11:48:12+5:302022-05-18T11:53:18+5:30
महापालिकेच्या ५२ प्रभागांची अंतिम रचना जाहीर करण्यात आली आहे. प्रभाग २९ च्या प्रभाग रचनेवरील आक्षेप मान्य केल्याने, प्रभाग ४६ व प्रभाग ४८ मधील काही भाग प्रभाग २९ मध्ये जोडण्यात आला आहे.
नागपूर : राज्य निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना मंगळवारी प्रसिद्ध केली आहे. माजी उपमहापौर किशोर कुमेरिया यांनी केलेला एकच आक्षेप मान्य करण्यात आला आहे. मात्र या एका आक्षेपासाठी तीन प्रभागात बदल करावे लागले आहे. इतरांनी प्रभाग रचनेवर घेतलेले आक्षेप नाकारण्यात आल्याने, ४९ प्रभागांची जुनीच रचना कायम राहणार आहे.
महापालिकेच्या ५२ प्रभागांची अंतिम रचना जाहीर करण्यात आली आहे. प्रभाग २९ च्या प्रभाग रचनेवरील आक्षेप मान्य केल्याने, प्रभाग ४६ व प्रभाग ४८ मधील काही भाग प्रभाग २९ मध्ये जोडण्यात आला आहे. आधी या प्रभागातील धन्वंतरीनगर व चिटणीसनगर या वस्त्यांचे दोन तुकडे करण्यात आले होते. यावर किशोर कुमेरिया यांनी आक्षेप घेतला होता. त्यांचा हा आक्षेप मान्य करण्यात आला आहे.
१० मे रोजी प्रभाग रचना राजपत्रात प्रकाशित करण्याचा कार्यक्रम जाहीर केला होता. १२ मे रोजी अंतिम प्रारूप मंजुरीसाठी राज्य निवडणूक आयुक्तांकडे स्वाक्षरीसाठी पाठविण्यात आले होते. मंगळवारी राजपत्रात प्रकाशित करण्यासोबतच वेबसाईट व सूचना फलकावर प्रकाशित करण्यात आले.
मनपाला आयोगाच्या निर्देशांची प्रतीक्षा
निवडणूक आयोगाने अंतिम प्रभाग रचना जाहीर केली आहे. महिला आरक्षण, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती उमेदवारांसाठी आरक्षणाची प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर सुरू केली जाणार आहे. तसेच आयाेगाच्या निर्देशानुसार मनपा निवडणुकीसाठी विधानसभा निवडणुकीची की नवीन मतदार यादी वापरावी लागणार हे स्पष्ट होईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
प्रभागाच्या लोकसंख्येत झाला बदल
प्रभाग क्रमांक आधीची लोकसंख्या सध्याची लोकसंख्या
२९ ४८८६४ ५४०९३
४६ ४३२१५ ४२२६६
४८ ४५३७२्र ४१०९२
- तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीने होणार निवडणूक
- १५६ जागांसाठी उमेदवार भाग्य अजमावणार
- नागपूर शहरात ५२ प्रभाग राहणार
- २६ प्रभागात एक पुरुष व दोन महिलांसाठी जागा आरक्षित राहणार
- ७८ जागा महिला उमेदवारांसाठी राखीव राहतील.