अखेर रुग्णवाहिकेवरील कर्मचाऱ्यांना मिळाल्या सुरक्षा साहित्य किट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:08 AM2021-05-08T04:08:39+5:302021-05-08T04:08:39+5:30
नागपूर : कोरोनाच्या जीवघेण्या संसर्गादरम्यान नागपूर महानगरपालिकेने सुरू केलेल्या २५ आपली बस रुग्णवाहिकांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अखेर दिलासा मिळाला ...
नागपूर : कोरोनाच्या जीवघेण्या संसर्गादरम्यान नागपूर महानगरपालिकेने सुरू केलेल्या २५ आपली बस रुग्णवाहिकांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अखेर दिलासा मिळाला आहे. त्यांना पीपीई किटसह ग्लोव्हज तसेच इतर साहित्याचे वाटप करण्यात आले. या रुग्णवाहिकांवरील कर्मचारी कुठल्याही सुरक्षेच्या साहित्यासह सेवा देत असल्याची बाब लोकमतने समोर आणली होती.
मनपाच्या रुग्णवाहिकांवरील चालक तसेच कंडक्टर्सला मनपा प्रशासनाकडून एन-९५ मास्क, पीपीई किट, ग्लोव्हज यांचा पुरवठाच करण्यात आलेला नव्हता. अशा स्थितीत या कर्मचाऱ्यांना संसर्गाचा धोका होता. नोकरीच्या भीतीपोटी कर्मचारी तसेच काम करत होते. लोकमतचे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर प्रशासनाने तातडीने पावले उचलली व आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या अप्रॉन, गॉगल, मास्क, फूट कव्हर, ग्लोव्ह्ज व इतर साहित्याचे त्यांना वाटप केले. नागपूर शहरातील ३५ ते ४० नागरिकांनी या रुग्णवाहिकांचा लाभ घेतला आहे, अशी माहिती मनपाच्या परिवहन विभागाचे प्रशासकीय अधिकारी रवींद्र पागे यांनी दिली.
मनपाचा दावा, दुसऱ्यांदा किटचे वाटप
दरम्यान, या कर्मचाऱ्यांना दुसऱ्यांदा व तिसऱ्यांदा किटचे वाटप करण्यात आल्याचा दावा मनपा प्रशासनातर्फे करण्यात आला. एकूण ११०-१२० चालक व वाहकांना या किट देण्यात आल्या असून सर्व जण ६ मेपर्यंत मनपा मुख्यालयात कार्यरत होते, असे सांगण्यात आले. परंतु लोकमतने गुरुवारीच मनपाच्या झोन पातळीवर उभ्या असलेल्या रुग्णवाहिका कर्मचाऱ्यांची स्थिती समोर आणली होती. विशेष म्हणजे रवींद्र पागे यांनीच किटचे वाटप झाले नसल्याची बाब मान्य केली होती. तरीदेखील मनपाकडून दुसऱ्यांदा किटचे वाटप झाले असल्याचा दावा केला. यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांची माहिती खरी की मनपाचा दावा खरा, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.