अखेर केंद्राला विदर्भातील पूरग्रस्त शेतकरी आठवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 11:43 PM2020-12-23T23:43:32+5:302020-12-23T23:45:57+5:30
flood-hit farmers of Vidarbha, nagpur news अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्राचे पथक नागपुरात दाखल होत आहेत. विदर्भात चार महिन्यांपूर्वी पूर आला. अतिवृष्टी झाली. त्याची पाहणी उद्यापासून दोन दिवस करण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्राचे पथक नागपुरात दाखल होत आहेत. विदर्भात चार महिन्यांपूर्वी पूर आला. अतिवृष्टी झाली. त्याची पाहणी उद्यापासून दोन दिवस करण्यात येणार आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीची पाहणी तब्बल चार महिन्यानंतर होत आहे, यावरून केंद्र सरकारला शेतकऱ्यांचा किती कळवळा आहे, हे दिसून येते.
ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी झाली. नद्यांना पूरपरिस्थिती निर्माण झाली. यामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाले. सरकारच्या आदेशावरून नुकसानाचे पंचनामे करण्यात आले. यात लाखो हेक्टर शेतपीक उद्ध्वस्त झाल्याचे समोर आले. राज्य सरकारने पुरामुळे झालेल्या नुकसानीसाठी आर्थिक मदत दिली. परंतु हा निधी तोकडा असल्याची टीका झाली. नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून मदत देण्याच्या मागणीचा प्रस्ताव शासनाकडून केंद्र सरकारला दिला. मुख्यमत्री, मुख्य सचिव व मदत व पुनर्वसन विभागाने अनेकदा पत्रव्यवहार केला. परंतु केंद्राकडून पथक पाठविण्यात आला नसल्याचा आरोप खुद्द मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार केला होता. त्यानंतर आता केंद्राकडून नुकसानग्रस्त भागाच्या पाहणीसाठी पथक पाठविण्यात येणार आहे. २४ डिसेंबरपासून नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा जिल्ह्याची नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली जाईल.
दोन पथक करणार पाहणी
केंद्रातून आलेल्या पथकाचे दोन गटात विभागणी होणार असून यातील एक गट २४ डिसेंबर रोजी नागपूर व २५ ला भंडारा जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करतील. तर दुसऱ्या गटातील अधिकारी २४ ला गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्याची पाहणी करतील.