अखेर सीईटीची वेबसाईट सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:07 AM2021-07-27T04:07:47+5:302021-07-27T04:07:47+5:30
नागपूर : अकरावीच्या सीईटीची वेबसाईट सोमवारी दुपारपासून सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांना २ ऑगस्टपर्यंत वेबसाईटवर जाऊन अर्ज भरता येणार आहे. ...
नागपूर : अकरावीच्या सीईटीची वेबसाईट सोमवारी दुपारपासून सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांना २ ऑगस्टपर्यंत वेबसाईटवर जाऊन अर्ज भरता येणार आहे. या वेबसाईटमध्ये तांत्रिक बिघाड आल्याने वेबसाईट बंद पडली होती.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे २१ ऑगस्ट रोजी सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी बोर्डाने वेबसाईट दिली आहे. यावर विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी करायची आहे. बोर्डाने ही प्रक्रिया २० जुलैपासून सुरू केली होती. परंतु तांत्रिक बिघाड झाल्याने वेबसाईट बंद पडली होती.
- नोंदणी करताना विद्यार्थ्यांनी भरावयाची माहिती
१)ई-मेल आयडी अथवा मोबाईल क्रमांक
२) परीक्षेचे माध्यम, विद्यार्थ्यांनी सेमी इंग्रजीचा विकल्प निवडल्यास त्याला इंग्रजी, गणित व विज्ञान या विषयांच्या प्रश्नासाठी इंग्रजी माध्यम राहणार आहे. तर सामाजिक शास्त्र विषयासाठी विद्यार्थ्यांस माध्यमिक निश्चित करायचे आहे.
३) विद्यार्थ्यांना निवासस्थानाजवळील परीक्षा केंद्र निश्चित करायचे आहे.
४) ज्या विद्यार्थ्यांनी दहावीचे अर्ज भरताना एसईबीसी प्रवर्गाची नोंदणी केली आहे. त्या विद्यार्थ्यांना आता खुला प्रवर्ग अथवा ईडब्ल्यूएस प्रवर्ग निवडायचा आहे.
- वेबसाईटमध्ये बिघाड होण्यापूर्वी ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहे. त्यांना अर्ज क्रमांक व मोबाईल नंबर टाकून अर्जाचा तपशील बघता येईल. ज्यांनी अर्ज केले आहे, त्यांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही.
माधुरी सावरकर, विभागीय सचिव, नागपूर बोर्ड
- अकरावीच्या केंद्रीय प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर
शिक्षण संचालनालयाने राज्यातील सहा महापालिका क्षेत्रात केंद्रीय प्रवेश समितीकडून घेण्यात येणाऱ्या अकरावीच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. संचालनालयातर्फे त्यासाठी संकेतस्थळ उपलब्ध करून दिले आहे. त्यात १ ऑगस्टपासून उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी नोंदणी करायची आहे. २ ऑगस्ट रोजी विभागीय शिक्षण उपसंचालकांनी शाळांनी भरलेली माहिती ऑनलाईन प्रमाणित करायची आहे. ९ ऑगस्टपासून विद्यार्थ्यांनी अकरावीच्या प्रवेशासाठीचा भाग १ फॉर्म भरायचा आहे व अर्ज प्रमाणित करून घेण्यासाठी मार्गदर्शन केंद्रावर जाऊन खात्री करून घ्यायची आहे. विद्यार्थ्यांना सरावासाठी १ ते ७ ऑगस्ट दरम्यान संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करून दिली आहे.