अखेर बंद वसतिगृहाचे उघडले कुलूप

By admin | Published: July 13, 2016 03:31 AM2016-07-13T03:31:55+5:302016-07-13T03:31:55+5:30

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो) १५ कोटी खर्चून बांधण्यात आलेले वसतिगृह फर्निचर

Finally closed hostel lock | अखेर बंद वसतिगृहाचे उघडले कुलूप

अखेर बंद वसतिगृहाचे उघडले कुलूप

Next

मेयोतील १५ कोटींचे वसतिगृह : ३९० विद्यार्थी घेणार आज ताबा
नागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो) १५ कोटी खर्चून बांधण्यात आलेले वसतिगृह फर्निचर अभावी नऊ महिन्यांपासून कुलूपात होते. या संदर्भातील वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच अधिष्ठाता डॉ. मधुकर परचंड यांनी याची गंभीर दखल घेतली. त्यांनी वसतिगृहासाठी आहे ते फर्निचर उपलब्ध करून देऊन ३९० विद्यार्थ्यांना वसतिगृहांच्या खोल्यांचे वितरण केले. बुधवारी विद्यार्थी आपल्या खोल्यांचा ताबा घेणार आहेत.
मेयोतील मुलांच्या वसतिगृहाच्या समस्यांना घेऊन मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाने (एमसीआय) ताशेरे ओढल्यानंतर १५ कोटींच्या वसतिगृहाच्या बांधकामाला सुरुवात झाली. पाच मजलीच्या या वसतिगृहाचे मेयो प्रशासनाकडे हस्तांतरणही झाले. परंतु नऊ महिन्याचा कालावधी होत असताना विद्यार्थ्यांना या वसतिगृहाचा ताबा देण्यात आलेला नव्हता. फर्निचर नसल्याचे कारण देत मेयो प्रशासनाने ही इमारत कुलूपात बंद ठेवली होती. विशेष म्हणजे, वैद्यकीय शिक्षण विभागाने (डीएमईआर) वसतिगृहाचे फर्निचर व महत्त्वाच्या उपकरण खरेदीसाठी मार्च २०१६ मध्ये २० कोटींचा निधी दिला. मेयो प्रशासनाने हा निधी नागपूर सुधार प्रन्यासकडे (नासुप्र) वळता केला. या निधीतून नासुप्रला साडेसहा कोटी रुपयांचे फर्निचर घेण्याची मान्यता आहे. या संदर्भात नुकतीच निविदा काढण्यात आली असून सप्टेंबर महिन्यापर्यंत फर्निचर येण्याची शक्यता असल्याचे नासुप्रचे म्हणणे आहे. तोपर्यंत विद्यार्थ्याना जुन्याच वसतिगृहात दिवस काढावे लागणार होते. या संदर्भातील ‘ मुलांचे वसतिगृह सुरू होणार सप्टेंबरमध्ये!’ या मथळ्याखाली ५ जुलै रोजी वृत्त प्रसिद्ध होताच मेयो प्रशासनाने याला गंभीरतेने घेतले. नवे फर्निचर येईल तेव्हा येईल, परंतु तूर्तास आहे ते फर्निचर उपलब्ध करून वसतिगृह सुरू करण्याचा निर्णय अधिष्ठाता डॉ. परचंड यांनी घेतला. त्यानुसार गेल्या आठवड्यापासून वसतिगृहातील खोल्यांचे वितरण सुरू करण्यात आले. बुधवारी विद्यार्थी आपल्या खोल्यांचा ताबा घेतील, अशी माहिती, डॉ. परचंड यांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Finally closed hostel lock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.