अखेर नागपूरचे कॉटन मार्केट उघडलेच नाही : महापौरांचे निर्देश पाळले नाहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2020 10:50 PM2020-04-04T22:50:03+5:302020-04-04T22:50:45+5:30
महापौर संदीप जोशी यांनी ४ एप्रिलपासून कॉटन मार्केट सुरू करण्याचे निर्देश दिले होते. पण मनपाच्या कर्मचाऱ्यांनी कॉटन मार्केटच्या प्रवेशद्वाराचे कुलूप न उघडल्याने शनिवारी बाजारात भाज्यांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार होऊ शकले नाहीत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आयुक्तांच्या पुढील आदेशापर्यंत कॉटन मार्केट बंद राहील, असे बोर्ड कॉटन मार्केटच्या गेटवर झळकत आहे. त्यानंतरही महापौर संदीप जोशी यांनी ४ एप्रिलपासून कॉटन मार्केट सुरू करण्याचे निर्देश दिले होते. पण मनपाच्या कर्मचाऱ्यांनी कॉटन मार्केटच्या प्रवेशद्वाराचे कुलूप न उघडल्याने शनिवारी बाजारात भाज्यांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार होऊ शकले नाहीत.
कॉटन मार्केट शनिवारपासून सुरू होणार असल्याचे आदेश महापौरांनी दिले. तसे वृत्तही सर्वच वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित झाले. त्यानुसार पहाटेपासून शेतकऱ्यांनी गाड्यांमधून भाज्या बाजारात आणल्या, शिवाय व्यापारी आणि अडतिये पोहोचले. पण मनपा कर्मचाऱ्यांनी आदेश नसल्याने गेट उघडता येणार नाही, असे सांगून सर्वांना परत पाठविले.
महात्मा फुले भाजी बाजार अडतिया असोसिएशनचे सचिव राम महाजन म्हणाले, निर्जंतुकीकरणासाठी बाजार दोन दिवस बंद ठेवणार असल्याचे मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी व्यापाऱ्यांना सांगितले होते. पण सहा दिवसानंतरही बाजार सुरू झाला नाही. महापौरांनी बाजार सुरू करण्याचे आदेश दिल्यानंतर आम्ही सर्व अडतिये पहाटेच बाजार परिसरात पोहोचलो. पण प्रवेशद्वार बंद होते. शेतकऱ्यांनी ४५ ते ५० गाड्यांमधून भाजीपाला विक्रीसाठी आणला होता. वाट पाहिल्यानंतर त्यांनाही भाज्या अन्य बाजारात विक्रीसाठी न्याव्या लागल्या. कॉटन मार्केट सुरू करण्याची शेतकरी, व्यापारी आणि अडतियांची मागणी आहे. त्यानुसार मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांना प्लॅन दिला आहे. गर्दी होऊ नये म्हणून सात गेटऐवजी दोन गेट सुरू करण्यास सांगितले आहे. शिवाय गाड्यांमधून भाज्या उतरवून दुकानात ठेवण्याची माहिती दिली आहे. दुकानातूनच विक्री करू, असे आम्ही सांगितले आहे. पण आयुक्तांनी या नियोजनावर अजूनही निर्णय घेतला नाही.
याउलट कळमना आणि कॉटन मार्केटमध्ये येणारे शेतकरी गाड्या घेऊन रेशीमबाग आणि अन्य ठिकाणी जात आहे. रेशीमबागेत गाड्या आणि भाज्या खरेदी करणाºया ग्राहकांची गर्दी होत आहे. या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. कॉटन मार्केटमध्ये शेतकºयांना भाज्या विक्रीला परवानगी दिल्यास रेशीमबागेत गर्दी होणार नाही, असे महाजन म्हणाले.