..अखेर राेडलगतचा जीवघेणा खड्डा बुजवला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:07 AM2021-05-17T04:07:25+5:302021-05-17T04:07:25+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क पारशिवनी : शहरातून गेलेल्या सावनेर-पारशिवनी-आमडी मार्गाच्या रुंदीकरणाच्या वेळी पारशिवनी शहरातील साई लेआउटमध्ये राेडलगत माेठा जीवघेणा खड्डा ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
पारशिवनी : शहरातून गेलेल्या सावनेर-पारशिवनी-आमडी मार्गाच्या रुंदीकरणाच्या वेळी पारशिवनी शहरातील साई लेआउटमध्ये राेडलगत माेठा जीवघेणा खड्डा तयार झाला हाेता. राेडचे काम पूर्ण हाेऊनही ताे खड्डा बुजविण्यात न आल्याने नागरिकांच्या तक्रारी वाढल्या हाेत्या. त्या तक्रारींची दखल घेत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ताे खड्डा अखेर रविवारी (दि. १६) बुजविला.
सावनेर-पारशिवनी-आमडी फाटा या मार्गाच्या रुंदीकरणाचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून करण्यात आले. या मार्गाचे काम करताना कंत्राटदार कंपनीने पारशिवनी शहरातील साई लेआउटमधील सांडपाण्याची नाली ताेडली. एवढेच नव्हे तर, तिथे माेठा खड्डाही तयार केला. या मार्ग व नालीचे काम पूर्ण झाल्यानंतर कंत्राटदार कंपनीने ताे खड्डा वेळीच बुजवण्याऐवजी तसाच ठेवला.
या ठिकाणाहून शहराला पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन आहे. राेडच्या कामामुळे पाइपलाइनचे काम प्रलंबित राहिले. त्यामुळे हा खड्डा बुजवण्यात यावा, यासाठी स्थानिक नगर पंचायत प्रशासन व नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे तक्रारी केल्या. शेवटी नगरसेवक विजय भुते यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अभियंता बाेरकर यांची भेट घेत ही समस्या समजावून सांगितली. त्यामुळे प्राधिकरणाने ही बाब गांभीर्याने घेत ताे खड्डा बुजवला आहे.