अखेर ठरलं! यंदापासून पदवीला ‘एनईपी’नुसारच प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2023 09:00 AM2023-06-06T09:00:00+5:302023-06-06T09:00:01+5:30
Nagpur News राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयात येत्या शैक्षणिक सत्रापासून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी) २०२० नुसार पदवी अभ्यासक्रम शिकविले जातील. विद्यापीठाच्या विद्वत्त परिषदेने सोमवारी याबाबतचा निर्णय घेतला.
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयात येत्या शैक्षणिक सत्रापासून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी) २०२० नुसार पदवी अभ्यासक्रम शिकविले जातील. विद्यापीठाच्या विद्वत्त परिषदेने सोमवारी याबाबतचा निर्णय घेतला.
राज्यातील सर्वच विद्यापीठांमध्ये नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० हे २०२३-२४ या शैक्षणिक सत्रापासून लागू करण्याचे निर्देश सरकारने दिले आहे. विद्यार्थ्यांमध्ये रोजगारक्षमता निर्माण व्हावी, या अनुषंगाने विद्यार्थी केंद्रित अभ्यासक्रमाची रचना सर्व विद्याशाखांमधील पदवी अभ्यासक्रमांसाठी करण्यात आली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीप्रमाणे मेजर-मायनर या विषयांची निवड करता येणार आहे. या व्यतिरिक्त कौशल्य आधारित अभ्यासक्रम, क्षमतावर्धन अभ्यासक्रम सोबतच सहअभ्यासक्रमांमधून विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे, असा विविधांगी निर्णय सरकारने घेतला आहे. सर्व विद्या शाखांतर्गत येणाऱ्या समान स्वरूप विषयांचे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना निवडता यावे, अशी शासनाची भूमिका आहे.
अभ्यासक्रमांची संरचना तयार
विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेत विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा, मानव विज्ञान विद्याशाखा आणि आंतर विद्याशाखीय अभ्यास विद्याशाखा आदी चार विद्याशाखांनी अंतर्गत येणाऱ्या अभ्यास मंडळाच्या सहकार्याने नवीन अभ्यासक्रमांची संरचना तयार केली आहे. नवीन अभ्यासक्रम तयार करण्यासाठी अभ्यास मंडळाकडून युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात आले. दोन महिने सातत्याने परिश्रम घेत नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रम परीक्षा योजना अभ्यास मंडळांनी तयार केल्या आहेत. तसेच संबंधित विद्याशाखांच्या बैठकींमध्ये या नवीन अभ्यासक्रम परीक्षा योजनांना मान्यता देण्यात आली आहे.
नवीन अभ्यासक्रम परीक्षा योजनाही लागू
सोमवारी झालेल्या विद्वत परिषदेच्या बैठकीत नवीन अभ्यासक्रम परीक्षा योजना लागू करण्यास मंजुरी देण्यात आली. या बैठकीला कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे, कुलसचिव डॉ. राजू हिवसे, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. प्रशांत माहेश्वरी, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. संजय कविश्वर, मानव विज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. श्याम कोरेटी आणि आंतर विद्याशाखीय अभ्यास विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. प्रशांत कडू आदी उपस्थित होते.
प्रथम वर्षापासून सुरुवात
२०२३-२४ या शैक्षणिक क्षेत्रात पदवी प्रथम वर्षाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार तयार अभ्यासक्रमांना प्रवेश दिले जातील. आगामी शैक्षणिक क्षेत्रात द्वितीय व तृतीय वर्षाला शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना हा बदल लागू राहणार नाही.