अखेर ठरलं! गणेश टेकडी मंदिरासमोरील उड्डाणपूल आठवडाभरात तुटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2023 20:31 IST2023-06-28T20:00:39+5:302023-06-28T20:31:39+5:30
Nagpur News नागपूर रेल्वे स्टेशन समोरील टेकडी उड्डाणपुलावर आठवडाभरातच बुलडोझर चालणार आहे. उड्डाणपुलाच्या खाली असलेल्या दुकानदारांचे न्यायालयात प्रलंबित असलेले प्रकरण निस्तारले आहे. उड्डाणपूल पाडून हा रस्ता सहा पदरी होणार आहे.

अखेर ठरलं! गणेश टेकडी मंदिरासमोरील उड्डाणपूल आठवडाभरात तुटणार
नागपूर : नागपूर रेल्वे स्टेशन समोरील टेकडी उड्डाणपुलावर आठवडाभरातच बुलडोझर चालणार आहे. उड्डाणपुलाच्या खाली असलेल्या दुकानदारांचे न्यायालयात प्रलंबित असलेले प्रकरण निस्तारले आहे. उड्डाणपूल पाडून हा रस्ता सहा पदरी होणार आहे. तसेच रेल्वे स्थानकावर येणाऱ्यांसाठी पार्किंगची सोय व २०० दुकानांचे शॉपिंग कॉम्प्लेक्स येथे बनणार आहे. महापालिकेकडे पुलाखाली असलेल्या दुकानांना खाली करण्याची जबाबदारी होती. गत ५ वर्षांपासून महापालिकेचे वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न सुरू होते. अखेर त्याला यश आल्याने आठवड्याभरातच पूल तुटणार असल्याचे संकेत अधिकाऱ्यांनी दिले आहे.
या उड्डाणपुलाची १६४ दुकाने वितरित करण्यात आली होती. यातील ११२ दुकानांचा प्रश्न आधीच संपुष्टात आला होता. ५२ दुकानदार न्यायालयात गेले होते. त्यांचेही प्रकरण न्यायालयाने संपविले. परंतु कनिष्ठ न्यायालयात परवानाधारकांचा प्रश्न कायम होता. त्यांनीही त्यांची याचिका मागे घेतली. या परवानाधारकांचा वाद निकाली काढण्यासाठी एक दिवसापूर्वीच मनपा मुख्यालयात बैठक झाली. यात ८ जणांना नुकसानभरपाई तर ७ जणांना ईश्वर चिठ्ठीने दुकानाच्या बदल्यात दुकाने देण्यावर सहमती झाली.
- मेट्रो तोडणार पूल
हा प्रकल्प साकारण्यात नागपूर महापालिका, मेट्रो रेल्वे व सार्वजनिक बांधकाम विभाग संयुक्तपणे कार्यवाही करीत आहे. नागपूर महापालिकेला उड्डाणपुलाखालील दुकाने रिकामे करून द्यायची होती. त्यानुसार महापालिकेने जबाबदारी पूर्ण केली आहे. पूल तोडण्याची जबाबदारी मेट्रोची आहे. या प्रकल्पाचे बांधकाम सीआरएफ फंडातून होणार आहे. हा फंड पीडब्ल्यूडीला मिळणार आहे. बांधकाम एजन्सी मेट्रो रेल्वे असून, प्रकल्पाचा प्लॅन तयार करणे तो मंजूर करणे आणि मेट्रो रेल्वेच्या माध्यमातून त्याची निर्मिती करून घेणे ही जबाबदारी पीडब्ल्यूडीची आहे.
उड्डाणपुलाखाली असलेल्या दुकानांना एमपी बस स्टॅण्ड परिसरात जागा उपलब्ध करून दिली आहे. २०० गाळ्यांचा हा प्रकल्प आहे. ३५ दुकानदारांनी हा प्रकल्प कधी पूर्ण होणार? कायमस्वरूपी कुठे होणार? यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका केली होती. पीडब्ल्यूडीकडून यासंदर्भात ॲफिडेव्हीट सादर करणार आहे. पण पूल तोडण्यासंदर्भातील न्यायालयीन प्रक्रिया पूर्णपणे निस्तारली आहे. त्यामुळे पूल तोडण्यात कुठलीही अडचण नाही. दुकाने तोडण्याचे काम आठवड्यात हे काम सुरू होईल.
मिलिंद मेश्राम, उपायुक्त, मनपा