अखेर शाळांच्या आवारात ध्वजाराेहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:14 AM2021-08-17T04:14:22+5:302021-08-17T04:14:22+5:30
राहुल पेटकर लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळांच्या मुख्याध्यापकांना पत्र पाठवून मार्गदर्शक सूचना दिल्या. या ...
राहुल पेटकर
लाेकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळांच्या मुख्याध्यापकांना पत्र पाठवून मार्गदर्शक सूचना दिल्या. या पत्रात शाळांचा उल्लेख नसल्याने मुख्याध्यापकांसह शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला हाेता. असे असले रामटेक तालुक्यातील प्रत्येक शाळेच्या आवारात शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकाेर पालन करीत ७४वा स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजाराेहण करण्यासाेबतच इतर कार्यक्रम पार पाडण्यात आले.
स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताकदिन व इतर राष्ट्रीय उत्सव साजरे करण्याबाबत शासनाच्या वतीने सर्व शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यालयांना मार्गदर्शक सूचना केल्या जातात. यावर्षी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) चिंतामन वंजारी व शिक्षणाधिकारी (माध्यमिक) रवींद्र काटाेलकर यांनी १३ ऑगस्ट राेजी रामटेक तालुक्यातील सर्व शाळांना पत्र पाठवून ७४ वा स्वातंत्र्यदिन कशा पद्धतीने साजरा करावा, याबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या.
राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने २ ऑगस्ट राेजी एक परिपत्रक जारी करीत ग्रामस्तरावर सरपंच किंवा गावप्रमुख हे ग्रामपंचायत मुख्यालयात ध्वजाराेहण करतील. या कार्यक्रमाला सर्व शिक्षकांनी सामाजिक अंतर राखून ध्वजाराेहण कार्यक्रमात उपस्थित राहावे, अशा सूचनाही दिल्या हाेत्या. त्याअनुषंगाने शिक्षण विभागाने शाळांना पत्र पाठवून मार्गदर्शक सूचना दिल्या.
या पत्रात ग्रामपंचायतचा उल्लेख असून, शाळांचा उल्लेख करण्यात आला नव्हता. त्यामुळे मुख्याध्यापकांसह शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला हाेता. काेराेना संक्रमणामुळे ध्वजाराेहण कार्यक्रमातून शाळांना वगळण्यात आले असावे. शिक्षकांना त्यांच्या गावांमधील ग्रामपंचायत कार्यालयात हाेणाऱ्या ध्वजाराेहण कार्यक्रमात सहभागी व्हायचे आहे, असे अंदाजही काहींनी व्यक्त केले. शेवटी यातून मार्ग काढण्यासाठी काही शिक्षकांनी गटशिक्षणाधिकारी संगीता तभाणे यांच्याची चर्चा केली आणि सर्व नियमांचे काटेकाेर पालन करून रामटेक तालुक्यातील प्रत्येक शाळेच्या आवारात ध्वजाराेहण करण्यात आले.
...
गटशिक्षणाधिकाऱ्यांशी चर्चा
हा संभ्रम दूर करण्यासाठी शिक्षकांनी गटशिक्षणाधिकारी संगीता तभाणे यांच्याशी चर्चा केली. या आदेशात कुठेही शाळेत झेंडावंदन करू नये, असा उल्लेख नाही. मग, शाळेत झेंडावंदन करायचे नाही, अशी चर्चा का करण्यात आली, असा प्रश्नही संगीता तभाणे यांनी शिक्षकांना विचारला. आदेशात शाळांचा उल्लेख नसल्याने गाेंधळ हाेणे स्वाभाविक असल्याचे त्यांनी सांगितले.
...
आदेशात स्पष्टता असायला हवी
शिक्षकांनी आपापल्या शाळांच्या आवारात ध्वजाराेहण केल्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयात हाेणाऱ्या ध्वजाराेहण कार्यक्रमात सहभागी व्हावे, असा या आदेशातील सूचनांचा शिक्षकांनी अर्थ घ्यायला हवा हाेता. दरवर्षी स्वातंत्र्यदिनी शाळेतील झेंडावंदन आटाेपल्यानंतर शिक्षक व विद्यार्थी ग्रामपंचायतमध्ये ध्वजाराेहणासाठी जातात. मग, वेगळा आदेश काढायची गरज काय हाेती. आदेश काढला तर त्यात स्पष्टता असायला हवी हाेती, असेही शिक्षकांनी सांगितले. शिक्षण विभागाने ही चूक अप्रत्यक्षरीत्या मान्य केली.