अखेर नागपुरातील अपहृत युवकाची हत्या , तणाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 12:08 AM2018-07-12T00:08:17+5:302018-07-12T00:11:54+5:30
फिरायला नेण्याच्या बहाण्याने वस्तीतील युवकाचे अपहरण करून अंबाझरीतील कुख्यात गुंड संतोष (वय ३२) आणि त्याचा भाऊ प्रशांत परतेकी (वय ३४) या दोघांनी त्याची हत्या केली. कुणाल शालिकराम चचाणे (वय १७) असे मृत युवकाचे नाव आहे. तो तेलंगखेडीतील बालाजी सायकल स्टोअर्सजवळ राहत होता तर आरोपी परतेकी बंधूही रामनगर तेलंगखेडी परिसरातच राहतात.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : फिरायला नेण्याच्या बहाण्याने वस्तीतील युवकाचे अपहरण करून अंबाझरीतील कुख्यात गुंड संतोष (वय ३२) आणि त्याचा भाऊ प्रशांत परतेकी (वय ३४) या दोघांनी त्याची हत्या केली. कुणाल शालिकराम चचाणे (वय १७) असे मृत युवकाचे नाव आहे. तो तेलंगखेडीतील बालाजी सायकल स्टोअर्सजवळ राहत होता तर आरोपी परतेकी बंधूही रामनगर तेलंगखेडी परिसरातच राहतात.
आरोपी संतोष आणिं त्याचा भाऊ प्रशांत या दोघांसोबत दोन दिवसांपूर्वी वाडीतील कुख्यात गुंड जेम्सचे कडाक्याचे भांडण झाले. हे भांडण सुरू असतानाच जेम्सने त्याचा मित्र कुणालला फोन करून फुटाळा तलावावर बोलवले. त्यानंतर आरोपी संतोष आणि
प्रशांतसोबतचा वाद तीव्र झाला. जेम्स आणि कुणालने संतोष आणि प्रशांतला तर, या दोघांनी जेम्स आणि कुणालला जीवे मारण्याची धमकी दिली. कसाबसा वाद निवळल्यानंतर हे सर्व एकमेकांना धमक्या देतच आपापल्या घरी गेले. या पार्श्वभूमीवर, संतोष आणि प्रशांतने कुणाल आणि जेम्सचा गेम करण्याचा कट रचला.
मंगळवारी सकाळी १० वाजता कुणालला त्याचा मित्र आकाश पाल याने फिरायला जाऊ, असे सांगून सोबत नेले. मागावर असलेले संतोष आणि प्रशांतही कुणालला रस्त्यात भेटले. जुने भांडण विसरून जा, आपण सोबत राहू असे म्हणत आरोपींनी कुणाल तसेच आकाशला आधी सीताबर्डी, नंतर भिवसनखोरी गिट्टीखदान आणि त्यानंतर वाडी परिसरात गेले. या तीनही ठिकाणी आरोपी आणि कुणाल यथेच्छ दारू पिले. दारूच्या नशेत टुन्न झालेले हे तिघे नंतर दवलामेटी, सोनबानगर पहाडावर गेले. आकाश पाल त्याच्या घरी परतला. रात्रीपर्यंत कुणाल घरी आला नाही. त्यामुळे कुणालचा भाऊ विशाल शालिकराम चचाणे (वय २०) याने आकाशला विचारणा केली असता त्याने कुणालला संतोष आणि प्रशांतने सोबत नेल्याचे सांगितले. विशालने रात्री उशिरापर्यंत शोधाशोध केली. मात्र, कुणाल किंवा आरोपी परतेकी बंधूपैकी कुणाचाच पत्ता लागला नाही. त्यामुळे रात्री अंबाझरी ठाण्यात तक्रार नोंदवली.
पीएसआय एन.डी. शेख यांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. अंबाझरीचे ठाणेदार भीमराव खंदाळे आणि त्यांचे सहकारी बेपत्ता कुणालसह आरोपींचा शोध घेत असतानाच आरोपी संतोष आणि प्रशांत पोलिसांच्या हाती लागले. त्यांना कुणालबद्दल विचारले असता आरोपींनी त्याची सोनबागनगर पहाडावर हत्या केल्याचे सांगितले. आरोपींना पोलिसांनी पहाडावर नेले, तेथे रक्ताच्या थारोळ्यात कुणालचा मृतदेह पडून होता. तो रुग्णालयात पाठवून पोलिसांनी आरोपींना अटक केली.
परिसरात प्रचंड तणाव
कुख्यात परतेकी बंधूंनी कुणालची हत्या केल्याची वार्ता परिसरात कळताच प्रचंड तणाव निर्माण झाला. विशेष म्हणजे, मृत कुणालने यापूर्वी प्रणय कावरेची हत्या केली होती. अल्पवयीन असल्यामुळे त्याची सुधारगृहातून लवकर सुटका झाली. त्यानंतर तो गुंडगिरी करू लागला. त्याचा मित्र जेम्स हासुद्धा वाडीतील कुख्यात गुंड आहे. त्याने खुशाल कुहिकेची हत्या केली आहे. संतोष परतेकी याने वाडीत दोघांची हत्या केली होती. त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याचा भाऊ प्रशांत हादेखील कुख्यात गुन्हेगार आहे. त्याने वर्धा येथे एकाची हत्या करण्याचा प्रयत्न केला होता. लुटमार, हाणामारी यासह अन्य गंभीर गुन्ह्यांतही तो आरोपी आहे. संतोष आणि प्रशांत अंबाझरी, वाडी, गिट्टीखदान, काटोल भागात दादागिरी करतात. त्यांची त्या भागात प्रचंड दहशत आहे.
कुणालसह जेम्सचाही होणार होता गेम
कुणाल आणि जेम्स हे नव्याने गुन्हेगारीत आले असले तरी, ते बेदरकारपणे कुणाच्याही अंगावर धावून जातात. त्यामुळे ते आपला गेम करू शकतात, अशी आरोपींना भीती होती. त्यामुळे त्यांनी आकाश आणि जेम्सचा गेम करण्याचा कट रचला होता. ठिकठिकाणी दिवसभर कुणालला दारू पाजून टुन्न केल्यानंतर निर्जन ठिकाणी नेऊन आरोपींनी त्याला जेम्सला फोन करायचा आग्रह धरला. त्याला बोलव आपण सेटलमेंट करू, असे ते वारंवार कुणालला म्हणत होते. मात्र, कुणालने त्यांना दाद दिली नाही. त्यामुळे आरोपींनी त्यालाच दगडाने ठेचून संपवले. दरम्यान, या हत्याकांडामुळे वाडी,अंबाझरी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस उपायुक्त राकेश ओला यांनी सायंकाळी अंबाझरी ठाण्यात जाऊन आरोपींची चौकशी केली. ठाणेदार भीमराव खंदाळे पुढील तपास करीत आहेत.