अखेर पारशिवनीत कोविड केअर सेंटर सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:09 AM2021-04-28T04:09:19+5:302021-04-28T04:09:19+5:30
पारशिवनी : तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. वेळेवर उपचार मिळत नसल्याने रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे पारशिवनी येथे ...
पारशिवनी : तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. वेळेवर उपचार मिळत नसल्याने रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे पारशिवनी येथे तातडीने कोविड केअर सेंटर सुरु व्हावे या मागणीने जोर धरला होता. प्रशासनाने याची दखल घेत शिवटेकडी जवळील मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह येथे कोविड केअर सेंटर सुरू केले आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पारशिवनी तालुक्यात जवळपास ८२ रुग्णांचा मृत्यू झाला. हा शासकीय आकडा असला तरी प्रत्यक्षात मृत्यसंख्या २०० च्या जवळपास आहे. तालुक्यातील डोरली, वाघोडा, तामसवाडी, ईटगाव, कन्हान, पारशिवनी, साटक, भागीमहारी, बाबुळवाडा, वऱ्हाडा, पारडी, खंडाळा, पालोरा, मेहंदी, नयाकुंड यासह ९० गावात कोरोनाचा झपाट्याने प्रसार झाला होता. एखाद्या रुग्णाकरिता ऑक्सिजन व बेडची तात्पुरती सोय करण्याकरितादेखील नागपूरला न्यावे लागत असे. रुग्णाला नागपूरला नेले तर बेडदेखील उपलब्ध होत नव्हते. त्यामुळे तालुक्यात मृतांचा आकडा दिवसागणिक वाढत होता. त्यामुळे तत्काळ उपाययोजना म्हणून कांद्री येथील जवाहर रुग्णालयाला कोविड रुग्णालय बनविण्यात आले. परंतु कन्हान परिसरातच रुग्णसंख्या जास्त असल्यामुळे पारशिवनीच्या आसपासच्या व आदिवासी भागातील रुग्णांची गैरसोय होत होती. त्यामुळे पारशिवनी येथेच कोविड केअर सेंटर व्हावे ही मागणी जोर धरू लागली होती. परंतु ऑक्सिजन पुरवठा, डॉक्टर, यंत्रसामग्री यांची कमतरता असल्यामुळे शासकीय स्तरावर चालढकल सुरू होती. शेवटी आ. आशिष जयस्वाल यांनी ऑक्सिजन, बेड इतर यंत्रसामग्री यांची सोय कोविड सेंटरकरिता उपलब्ध करून दिली. तसेच पारशिवनीतील जे शासकीय डॉक्टर इतर तालुक्यात व नागपूर येथे प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात आले होते तो सर्व स्टाफ वापस बोलाविला. या कामी पारशिवनीचे तहसीलदार वरुणकुमार सहारे, आरोग्य अधिकारी आणि पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनीदेखील सहकार्य केले. मंगळवारी दुपारी कोविड केअर सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आ. आशीष जयस्वाल, उपविभागीय अधिकारी मीनल कडस्कर, तहसीलदार वरुणकुमार सहारे, नगरपंचायत मुख्याधिकारी अर्चना वंजारी, खंडविकास अधिकारी अशोक खाडे, पोलीस निरीक्षक संतोष वैरागडे, नायब तहसीलदार कैलास अल्लेवार, डॉ.अन्सारी, डॉ. बर्वे, उपसभापती चेतन देशमुख, नगरसेवक विजय भुते, गौरव पणवेलकर, रूपेश खंडारे, अमोल कनोजे उपस्थित होते .
औषधी व यंत्रसामग्री पुरवठा हवा
पारशिवनी येथे कोविड केअर सेंटर नव्याने सुरू करण्यात आल्यामुळे या ठिकाणी औषधी व यंत्रसामग्रीची काही प्रमाणात कमतरता आहे. पारशिवनी येथील आरोग्य अधिकारी यांनी गेल्या काही दिवसांपासून साहित्यासाठी पाठपुरावा केला तरी शासन अद्यापपर्यंत पूर्ण साहित्य पुरवठा करण्यात अपयशी ठरत आहे.