अखेर काेराेना रुग्णांना मिळाली औषधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:09 AM2021-03-18T04:09:08+5:302021-03-18T04:09:08+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क उमरेड : कोरोना रुग्णांना नि:शुल्क औषधांचा लाभ मिळत नाही. त्यांच्याकडे औषधांची चिठ्ठी सोपवित खासगी औषधी दुकानात ...

Finally, the patients got the medicine | अखेर काेराेना रुग्णांना मिळाली औषधी

अखेर काेराेना रुग्णांना मिळाली औषधी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

उमरेड : कोरोना रुग्णांना नि:शुल्क औषधांचा लाभ मिळत नाही. त्यांच्याकडे औषधांची चिठ्ठी सोपवित खासगी औषधी दुकानात पाठविले जाते, असा खळबळजनक प्रकार उजेडात येताच लागलीच ‘त्या’ रुग्णांना घरपोच औषधी मिळाल्या. लोकमतने बुधवारी (दि.१७) ‘कोरोनाबाधित रुग्णांना औषधांसाठी बाहेरचा रस्ता’ आणि ‘हे कसले कोविड लसीकरण केंद्र’ या शीर्षकाखाली दोन वेगवेगळ्या बातम्या प्रकाशित केल्या. कोविड सेंटरमधील हा प्रकार केवळ लोकमतने उजेडात आणताच सर्वत्र एकच धावपळ सुरू झाली. आमदार राजू पारवे यांनी ग्रामीण रुग्णालय गाठले. कोरोना रुग्णांना बाहेरील औषधी आणावयास सांगणे ही बाब गंभीर असून, लसीकरण कार्यप्रणालीवरही त्यांनी बोट ठेवले.

दरम्यान, बुधवारी प्रस्तुत प्रतिनिधीने लसीकरणस्थळी प्रत्यक्ष भेट दिली असता, लसीकरणस्थळी कालपेक्षा गर्दी अधिक दिसून आली. परिस्थिती जैसे थेच होती. नोंदणी व्यवस्थेच्या सभोवताल वृद्ध नागरिकांचा घोळका होता. लसीकरण कक्षात चार वृद्ध खुर्चीवर खेटून होते. प्रतीक्षा कक्षातही तीच अवस्था दिसून आली. अतिशय कमी जागेत लसीकरणाचे काम डॉक्टरांच्या देखरेखीशिवाय सुरू होते. ज्या कोरोना रुग्णांना औषधीबाबतची विचारणा प्रस्तुत प्रतिनिधीने केली होती, त्यांनी आम्हाला औषधी मिळाल्याचीही बाब सांगितली. ही बाब लोकमतने उजेडात आणल्यामुळेच आम्हास औषधी मिळाल्याचा आनंदही रुग्णांनी व्यक्त केला.

कोरोना रुग्णांना आशा वर्करच्या माध्यमातून औषधी पोहाेचवा. रुग्णांना चिठ्ठी लिहून बाहेरून औषधी बोलावण्यास सांगू नका. यानंतर असला प्रकार खपवून घेतला जाणार नाही, अशीही बाब आ. राजू पारवे यांनी अधिकाऱ्यांना सुनावली. येत्या काही दिवसातच उमरेड येथे कोविड सेंटर सुरू करणार. या ठिकाणी रुग्णांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही, याची काळजीसुद्धा घेतली जाणार आहे, असेही पारवे यांनी स्पष्ट केले.

....

अहवाल मिळतो उशिरा

उमरेड ग्रामीण रुग्णालयात लसीकरण स्थळापासूनच काही अंतरावर कोरोना चाचणी केली जाते. रॅपिड अ‍ॅन्टिजेन टेस्ट आणि आरटीपीसीआर या दोन प्रकारच्या चाचण्या होतात. यापैकी अ‍ॅन्टिजेन टेस्टचा रिपोर्ट लगेच कळत असला तरी आरटीपीसीआर चाचणीचे नमुने नागपूरला पाठवावे लागतात. साधारणत: दोन ते तीन दिवस अहवाल कळायला लागतो. यादरम्यान कोरोना चाचणी करणारा व्यक्ती २-३ दिवस गाव फिरतो नंतर पॉझिटिव्ह अहवाल येताच तारांबळ उडते. चाचणी ते औषधोपचार रुग्णांनी काळजी घ्यावी, असे आवाहन केले जात आहे. शिवाय, कोरोना चाचणी अहवाल २४ तासात उपलब्ध व्हावा, अशी मागणी केली जात आहे.

Web Title: Finally, the patients got the medicine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.