अखेर बिल्डरविरुद्ध गुन्हा दाखल : कोट्यवधींचा भूखंड हडपण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 01:10 AM2019-01-19T01:10:19+5:302019-01-19T01:12:14+5:30
कोट्यवधींचा भूखंड हडपण्याच्या तयारीने एका व्यक्तीच्या राहत्या घरावर कब्जा करू पाहणाऱ्या दोन बिल्डर तसेच त्यांच्या साथीदारांविरुद्ध प्रतापनगर पोलिसांनी दरोडा घालण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोट्यवधींचा भूखंड हडपण्याच्या तयारीने एका व्यक्तीच्या राहत्या घरावर कब्जा करू पाहणाऱ्या दोन बिल्डर तसेच त्यांच्या साथीदारांविरुद्ध प्रतापनगर पोलिसांनी दरोडा घालण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. पंकज ज्ञानेश्वर निगोट आणि मिलिंद मधुकर देशमुख अशी मुख्य आरोपींची नावे आहेत. हे दोघेही बिल्डर असून गोपालनगरात राहतात. त्रिमूर्तीनगरातील भांगे विहारमध्ये महेंद्र रामदास भांगे (वय ३९) यांचा भूखंड (क्रमांक १८ , १९ आणि २० आर) आहे. त्या भूखंडावर त्यांचे तीन खोल्यांचे घर असून त्यांनी वॉल कंपाऊंडही घातले होते. तेथे सीसीटीव्ही आणि भूखंडाचा मालकी हक्क दर्शविणारा फलक त्यांनी लावला होता. बुधवारी दुपारी १ च्या सुमारास आरोपी निगोट आणि देशमुख आपल्या साथीदारांसह भांगे यांच्या भूखंडावर पोहचले. त्यांनी वॉल कंपाऊंडवर चक्क बुलडोजर चालवून ते तोडले. जमीन सपाट करून भूखंडावर मोठमोठे खड्डे खोदून सीसीटीव्ही कॅमेरे, फलक तोडून फेकून दिला. भांगे यांचा मालकी हक्क दर्शविणारा फलक तोडून चोरून नेला आणि भांगे यांच्या घरातील साहित्य बाहेर फेकून दिले. आरोपींनी भांगे यांना धमकी देऊन त्यांच्या भूखंडावर आपल्या नावाचा फलक लावला. तसेच
भांगे यांना तेथे येण्यास मज्जाव केला. परत येथे आले तर जीवे ठार मारू, अशी धमकीही आरोपीनी दिली. या संपूर्ण प्रकरणात प्रतापनगर पोलिसांनी कमालीची संशयास्पद भूमीका वठवली. भांगे यांनी तातडीने तक्रार करूनही पोलिसांनी आरोपींना तातडीने आवरण्याऐवजी मुद्दामहून वेळकाढू धोरण अवलंबले.
आयुक्तांनी घेतली गंभीर दखल
सोशल मीडियावर हे प्रकरण व्हायरल झाल्याने पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी त्याची गंभीर दखल घेतली. पोलीस उपायुक्त विवेक मासाळ यांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आयुक्तांनी आदेश दिले. त्यानुसार, उपायुक्त मासाळ यांनी चौकशी करून आरोपी निघोट, देशमुख आणि साथीदारांविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला. आरोपींना वृत्त लिहिस्तोवर अटक झाली की नाही, ते प्रतापनगर ठाण्यातून स्पष्ट झाले नव्हते.