अखेर वीज निर्मिती प्रशासन बॅकफूटवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:07 AM2021-07-22T04:07:44+5:302021-07-22T04:07:44+5:30
कोराडी : येथील वीज वसाहतीची इतर दोन प्रवेशद्वार सर्वसामान्यांसाठी खुली करण्यासाठी कोराडी वीज निर्मिती प्रशासन अखेर राजी झाले. बुधवारपासून ...
कोराडी : येथील वीज वसाहतीची इतर दोन प्रवेशद्वार सर्वसामान्यांसाठी खुली करण्यासाठी कोराडी वीज निर्मिती प्रशासन अखेर राजी झाले. बुधवारपासून वीज वसाहतीचे घोंगे ले-आऊटकडील एक व मानवटकर ले-आऊट व धुळस ले-आऊट या दोनपैकी एक असे एकूण दोन प्रवेशद्वार सर्वसामान्यांना प्रवेशासाठी खुले करणार आहे. मार्च २०२० च्या लाॅकडाऊनपासून या वीज वसाहतीचे एक मुख्य प्रवेशद्वार वगळता (गेट क्रमांक २) इतर सर्व प्रवेशद्वार बंद करण्यात आले होते. त्यामुळे वीज वसाहतीच्या बाजूने असलेल्या वसाहती तसेच विद्यार्थी पालक शेतकरी व शेतमजुरांना अडचण निर्माण होत होती. लोकमतने २० जुलै रोजी यासंदर्भात वृत्त प्रकाशित केल्यानंतर बुधवारी प्रशासनाने यासंदर्भात महादुल्याचे नगराध्यक्ष राजेश रंगारी व इतर कार्यकर्त्यांसोबत बैठक बोलावली. या बैठकीला कोराडी वीज निर्मितीचे मुख्य अभियंता राजकुमार तासकर ,राजेंद्र घुगे ,वीज केंद्राच्या सुरक्षा विभागाचे अधिकारी व पोलीस विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत वीज निर्मिती प्रशासन कोराडी वीज वसाहतीच्या धुळस ले-आऊट व मानवटकर ले-आऊट या भागाकडील एक प्रवेशद्वार तसेच घोंगे ले-आऊटकडून प्रवेशद्वार सकाळी ६ ते सायंकाळी ८ पर्यंत सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात येणार आहे. तसेच याच प्रवेशद्वारातून इतरही वेळेला ओळख पटवून दिल्यानंतर गरजेनुसार प्रवेश देण्याचे मान्य करण्यात आले आहे. २२ जुलैपर्यंत हे प्रवेशद्वार सर्वसामान्यांसाठी खुले करा अथवा गेट खोलो आंदोलन करण्याचा इशारा राजेश रंगारी यांनी दिला होता.