अखेर सरपंच नूतन काळे पायउतार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 04:37 AM2021-02-05T04:37:16+5:302021-02-05T04:37:16+5:30
भिवापूर : थेट जनतेतून निवडून पदारूढ झालेल्या महिला सरपंचाला अखेरीस जनतेनेच पायउतार केले. ग्रामपंचायत सदस्यांनी आणलेल्या अविश्वासाच्या आधारे प्रशासनाने ...
भिवापूर : थेट जनतेतून निवडून पदारूढ झालेल्या महिला सरपंचाला अखेरीस जनतेनेच पायउतार केले. ग्रामपंचायत सदस्यांनी आणलेल्या अविश्वासाच्या आधारे प्रशासनाने बुधवारी मानोरा येथे ग्रामसभाद्वारे मतदान प्रक्रिया राबविली. यात ६४ मतांच्या फरकाने सरपंच नुतन काळे यांना पायउतार व्हावे लागले. तालुक्यातील मानोरा या सात सदस्यीय ग्रामपंचायतीत २०१८ मध्ये नूतन वसंता काळे या थेट जनतेतून सरपंचपदी आरूढ झाल्या होत्या. मात्र, सदस्यांना विश्वासात न घेता त्या कामे करत असल्याने प्रारंभीपासूनच येथे सरपंचाविरुद्ध धुसफुस सुरू होती. मात्र, थेट जनतेतून सरपंच असल्यामुळे लागलीच अविश्वास आणणे शक्य होत नव्हते.
दरम्यान, आवश्यक कालखंड पूर्ण होताच येथील सदस्यांनी एकत्रित येत ३० डिसेंबर रोजी सरपंचाविरोधात अविश्वास आणला. त्या आधारावर तहसीलदारांनी ५ जानेवारी रोजी मानोरा ग्रामपंचायतीत सभेचे आयोजन केले. यात सातही सदस्यांनी सरपंचाविरोधात हात उंचावत, अविश्वासाचा ठराव पारित केला. मात्र, त्यानंतरही जनतेतून आलेल्या सरपंच असल्यामुळे प्रशासनाने बुधवारी ग्रामसभेचे आयोजन करत मतदान प्रक्रिया राबविली. यात ६७३ मतदारांनी मतदान केले. तब्बल ३१ मतदान अवैध ठरले. ठरावाच्या बाजूने ३५३, तर विरोधात २८९ मतदारांनी मतदान केले. त्यामुळे सरपंच नूतन वसंता काळे यांना ६४ मतांनी पदावरून पायउतार व्हावे लागले. पिठासीन अधिकारी म्हणून खंडविकास अधिकारी माणिक हिमाने उपस्थित होते.