अखेर नागपुरातील शाळांची वाजली घंटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 09:15 PM2021-01-04T21:15:13+5:302021-01-04T21:21:37+5:30
School begin, nagpur news १० महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर शहरातील शाळा सोमवारी विद्यार्थ्यांनी गजबजल्या. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांची संख्या कमी असली तरी, शाळा सुरू झाल्याचा उत्साह विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये प्रचंड प्रमाणात दिसून आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : १० महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर शहरातील शाळा सोमवारी विद्यार्थ्यांनी गजबजल्या. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांची संख्या कमी असली तरी, शाळा सुरू झाल्याचा उत्साह विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये प्रचंड प्रमाणात दिसून आला. शाळा सुरू करताना घ्यावयाच्या खबरदारीच्या सर्व उपाययोजना प्रशासनाने केल्या होत्या. विद्यार्थ्यांना वर्गात पाठविताना त्यांची थर्मल स्क्रीनिंग करण्यात आली. प्रत्येक विद्यार्थ्याला मास्क अनिवार्य करण्यात आला होता, तर वर्गामध्ये केवळ एका बेंचवर एकाच विद्यार्थ्याची आसन व्यवस्था केली होती. काही शाळांमध्ये वर्गातच प्रार्थना झाली. पहिल्याच दिवशी साडेतीन तास शाळा चालली. विद्यार्थ्यांना अनेक दिवसांनंतर जुने मित्र मिळाले. त्यामुळे त्यांचा आनंद द्विगुणित झाला होता, तर शिक्षकांनाही वर्गात विद्यार्थी प्रत्यक्ष बघितल्यामुळे शिकविण्याचा वेगळा उत्साह दिसून आला. शाळा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर मनपा प्रशासनाने सर्वच शाळा सॅनिटाईज करून दिल्या होत्या. शाळांनीही सुरक्षेचे सर्व नियम पाळल्याने कुठलाही धोका निर्माण झाला नव्हता. पहिल्याच दिवशी शाळा यशस्वीरित्या भरल्याने विद्यार्थी व पालकांच्या मनात असलेली भीती पुरती निघून गेली.
२१९ शिक्षक निघाले पॉझिटिव्ह
शहरातील ५९३ शाळांमध्ये ६२५२ शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी कार्यरत आहे. यापैकी महापालिका प्रशासनाला ५३५६ शिक्षकांचे कोरोना चाचणीचे अहवाल प्राप्त झाले. त्यात १९ शिक्षकांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती आहे. या शिक्षकांना शाळेत येण्यास बंदी घालण्यात आली आहे.